India-US Talks: “आम्हा सर्वांचं तुमच्यावर प्रेम आहे”; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प– पीएम मोदी यांच्यात 40 मिनिटे संवाद, होर्मुझ नाकेबंदी व पश्चिम आशियातील तणावावर चर्चा
India-US Talks: दरम्यान, यापूर्वी २ फेब्रुवारी रोजी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार करारावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती, तर २४ मार्च रोजीही द्विपक्षीय व्यापारविषयक निर्णय घेण्यात आले होते. इस्लामाबाद येथील शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आणि मध्यपूर्वेतील संघर्ष अद्याप कायम असताना, ट्रम्प–मोदी संवादाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

India-US Talks: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, या संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी “आम्हा सर्वांचं तुमच्यावर प्रेम आहे,” असा मैत्रीपूर्ण संदेश मोदींना दिल्याची माहिती अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गोई गौर (Sergio Gor) यांनी दिली.
अमेरिका–इराण दरम्यान युद्धविराम आणि शांतता चर्चेची पहिली फेरी पार पडल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा पहिलाच संवाद ठरला. सुमारे ४० मिनिटांच्या चर्चेत पश्चिम आशियातील संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी आणि जागतिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय झाला.
या संवादात होर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवणे किती महत्त्वाचे आहे, यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. जागतिक व्यापारासाठी ही सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तसेच द्विपक्षीय सहकार्य, सामरिक भागीदारी आणि विविध आंतरराष्ट्रीय विषयांवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी या संवादाची माहिती ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली.
२०१७ मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर आणि पुन्हा २०२४ मध्ये सत्तेत आल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील संबंध अधिक दृढ झाल्याचे मानले जाते. या संभाषणातही दोघांनी एकमेकांचा ‘मित्र’ म्हणून उल्लेख केल्याची माहिती पुढे आली आहे.
A very positive and productive call! Stay tuned… https://t.co/Hv8Kn1rZ0q
— Ambassador Sergio Gor (@USAmbIndia) April 14, 2026
दरम्यान, यापूर्वी २ फेब्रुवारी रोजी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार करारावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती, तर २४ मार्च रोजीही द्विपक्षीय व्यापारविषयक निर्णय घेण्यात आले होते. इस्लामाबाद येथील शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आणि मध्यपूर्वेतील संघर्ष अद्याप कायम असताना, ट्रम्प–मोदी संवादाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.





