भारत-अमेरिकेने समतोल दरांबाबत एकमताने निर्णय घ्यावा; अमेरिकेचे राजदूत एरिक गॅरसेट्टी यांची सूचना

नवी दिल्ली – भारत हा सर्वात जास्त शुल्क लावणार्या मोठ्या अर्थव्यवस्था पैकी एक अर्थव्यवस्था आहे हे खरे आहे. मात्र भारत आणि अमेरिकेने एकत्रित बसून विविध वस्तूवर किमान कसे शुल्क लावता येईल यासंदर्भात विचारण्याची गरज आहे. तरच दोन्ही देशादरम्यान चालू असलेला व्यापार आणखी वाढू शकतो, असे मत अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गॅरसेट्टी यांनी म्हटले आहे.
भारत -अमेरिका व्यापार परिषदेने आयोजित केलेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण विषयावर बोलताना ते म्हणाले की, दोन्ही देशांदरम्यान सध्या तिखट शब्दाचा वापर परस्पराविरोधात केला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र दोन देश अधिक जवळ आल्यानंतर तिखट शब्दाचा वापर करूनही परस्परांना समजून घेऊ शकतात असे त्यांचे म्हणणे होते. नुकतेच निवडून आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत सर्वात जास्त शुल्क लावणारा देश आहे असे म्हटले आहे. जर भारताने अमेरिकेच्या वस्तूवर आयात शुल्क लावले तर आम्हीही त्या प्रमाणात भारताच्या वस्तूवर आयात शुल्क लावू असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.
एरिक गॅरसेट्टी म्हणाले की, दोन्ही देशांदरम्यान वस्तूची आणि मनुष्यबळाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होते. कारण आपण परस्परावर बरेच अवलंबून आहोत. अशा परिस्थितीत दोन्ही देशांना फायदा व्हावा, दोन्ही देशाचा व्यापार वाढावा यासाठी संतुलित पद्धतीने चर्चा करण्याची गरज आहे.
दोन्ही देशांदरम्यान विविध कंपन्यांदरम्यान सहकार्य चालू आहे. ते अधिक वाढले तर दोन्ही देशांना अधिक फायदा होऊ शकेल. दोन्ही देशांदरम्यान काही विषयावर खटके उडत असतानाही गेल्या काही वर्षात भारताची आणि अमेरिकेचा व्यापार दहा पटीने वाढला आहे. भारताचा अमेरिकेबरोबर सर्वात जास्त व्यापार होतो. येथून आपण माघार घेऊन चालणार नाही.
भारत विविध वस्तूंवर जास्त आयात शुक लागतो ही वस्तुस्थिती आहे. आपण या सर्व बाबीचे मूल्यांकन करून चर्चा करण्याची गरज आहे. भारत फक्त शुल्क जास्त लावत नाही तर भारतातील अनेक नियम आयातीसाठी अडथळे ठरत . हे नियम दुरुस्त करण्याची आवश्यकता वाढली आहे. गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला 77 अब्ज डॉलरचे निर्यात केली तर आयात 42 अब्ज डॉलर केली.व्यापारातील हे असंतुलन कमी करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
प्रामाणिक भावनेने चर्चेची गरज –
आपण प्रामाणिकपणे या मतभेदाच्या विषयावर चर्चा केली तर यातून सहज मार्ग निघू शकेल. दोन्ही देशात लोकशाही असल्यामुळे चर्चेवर आपण विश्वास ठेवण्याची आणि मार्ग काढण्याची गरज आहे. 2001 पासून भारत अमेरिकेदरम्यानचा व्यापार वाढत आहे. आपण चर्चा करून मार्ग काढल्यास हा व्यापार आणखी वाढू शकेल. भारत आणि अमेरिकेतील जनतेदरम्यान विश्वासाचे वातावरण आहे. दोन्ही देशाच्या सरकारनी परस्परादरम्यान विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.





