India-UK FTA: भारत-ब्रिटन देशांमध्ये झाला मुक्त व्यापार करार: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार? जाणून घ्या

India-UK FTA: भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकताच झालेला मुक्त व्यापार करार (एफटीए) भारतीय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे म्हंटले जात आहे. या करारामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन ब्रिटनच्या बाजारात कमी खर्चात विकता येईल. यामुळे त्यांचा नफा वाढेल आणि नव्या संधी उपलब्ध होतील.
या करारामुळे भारतातील 95 टक्के शेती उत्पादने आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, जसे की हळद, मिरची, वेलची, डाळी, लोणचे, फळांचा रस आणि रेडी-टू-ईट जेवण, ब्रिटनमध्ये कोणत्याही आयात कराशिवाय निर्यात होऊ शकतील. याशिवाय झिंगे, ट्युना यांसारख्या समुद्री उत्पादनांवरही कर माफ होईल. सध्या या उत्पादनांवर 4.2 ते 8.5 टक्के कर लागतो, जो आता हटवला जाईल. यामुळे शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा फायदा होईल.
ब्रिटन दरवर्षी 37.52 अब्ज डॉलरची शेती उत्पादने आयात करतो, पण भारताचा वाटा फक्त 811 दशलक्ष डॉलर आहे. या करारामुळे पुढील तीन वर्षांत भारताची निर्यात 20 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. यामुळे भारत 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरच्या शेती निर्यातीचे लक्ष्य गाठण्यास जवळ जाईल.
महाराष्ट्रातील द्राक्षे, कांदा, गुजरातची भुईमूग, पंजाब-हरियाणाचा बासमती तांदूळ, केरळचे मसाले आणि ईशान्य भारतातील बागवानी उत्पादनांना ब्रिटनच्या बाजारात नवीन ओळख मिळेल. गोव्यातील फेनी, नाशिकच्या वाईन्स आणि केरळच्या ताडीला उच्चभ्रू बाजारात स्थान मिळेल. हा करार डेअरी आणि खाद्य तेल यांसारख्या क्षेत्रांचे संरक्षण करतो, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.





