नवी दिल्ली – तंत्रज्ञान क्षेत्रातील फेसबुक, अॅमेझॉन, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स आणि गुगल या प्रमुख अमेरिकन कंपन्यांनी 2025 या वर्षात भारतात एकत्रितपणे 32 हजारांहून अधिक नवीन कर्मचार्यांची भरती केली आहे. भारतातील बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या कर्मचारीसंख्येत ही वार्षिक 28 टक्के वाढ आहे. यासह बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील भारतीय कर्मचार्यांची संख्या 2,14,000 इतकी झाली आहे. नोकरभरतीमधील ही वाढ वेगाने विस्तारत असलेल्या एआय क्षेत्रात भारतीय कर्मचार्यांच्या तंत्रज्ञान प्रतिभेची वाढती मागणी दर्शवते. 2025 या वर्षासाठी या कंपन्यांच्या कर्मचारीसंख्येत झालेली वाढ ही गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक आहे. कर्मचारीसंख्येत वाढ होऊनही अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्या सर्वसाधारण पदांऐवजी केवळ विशिष्ट पदांसाठीच भरती करत आहेत. 2025 मध्ये मोठ्या टेक कंपन्यांची भरती प्रामुख्याने एआय, एमएल ऑपरेशन्स, इंजिनिअरिंग डेटा, अॅनालिटिक्स, क्लाउड, सायबर सिक्युरिटी आणि गव्हर्नन्स यांसारख्या नवीन डिजिटल कौशल्यांवर केंद्रित होती. कर्मचारीसंख्येत वाढ मर्यादित असली तरी या पदांची मागणी जवळपास 25-30 टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय कर्मचार्यांची मागणी प्रामुख्याने पारंपरिक सपोर्ट फंक्शन्सऐवजी उच्च-मूल्याच्या, विशेष तंत्रज्ञान कौशल्यांवर केंद्रित आहे. एआयच्या वापराचा परिणाम अद्याप भरती प्रक्रियेत पूर्णपणे दिसून आलेला नाही. कारण या कंपन्या थेट एआय पदांसाठी नव्हे, तर एआय क्षमतांचा विस्तार करणाशी संबंधित कौशल्य असलेल्या कर्मचार्यांची भरती करत आहेत. एआयमुळे होणारे नोकरभरतीमधील बदल पुढील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत अधिक स्पष्टपणे दिसून येतील. या वर्षात मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉनसह इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी भारतात एआय पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आपली गुंतवणूक दुप्पट केली आहे. ओपन एआयसारख्या एआय कंपन्या भारताकडे त्यांची प्रमुख ग्राहक बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. त्यामुळे त्यांना देशात कार्यालये आणि डेटा सेंटर्स स्थापन करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.