भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेतील पुणे येथे झालेला दुसरा सामनाही न्यूझीलंडने जिंकल्यामुळे भारताला मालिका पराभवाची कडू चव चाखायला मिळाली. तब्बल तेरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाला मायभूमीमध्ये कसोटी मालिका गमवावी लागली आहे. त्याचबरोबर ओळीने 18 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रमही खंडित झाला आहे. गेली काही वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणार्या भारतासाठी हा एक मोठा धक्का आहे. आगामी कालावधीमध्ये होणार्या महत्त्वाच्या सामन्यांचा विचार करता भारतीय क्रिकेट संघासाठी हा एक वेकअप कॉल ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने काही वर्षांपूर्वी जेव्हा कसोटी क्रिकेट विश्वचषकाचे नियोजन केले होते त्यानंतर आतापर्यंत झालेल्या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम फेरीपर्यंत भारताने धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीमध्ये प्रथम ऑस्ट्रेलिया आणि दुसर्या वेळी न्यूझीलंडने भारताचा पराभव केला त्यामुळे कसोटीचा विश्वचषक भारताला जिंकता आलेला नाही. खरेतर गेल्या काही कालावधीपासून भारताचे कसोटी क्रिकेटमधील यश लक्षणीय ठरत असतानाच आता मायभूमीवरच न्यूझीलंडने भारताला पराभूत केल्याने पुन्हा एकदा भारताला आपल्या संघाच्या रचनेचा आणि कमकुवत बाजूंचा विचार करावा लागणार. यावर्षी कसोटी क्रिकेट विश्वचषक मालिकेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताचा आता जरी गुण तालिकेत पहिला क्रमांक असला, तरी विजयाची टक्केवारी मात्र झपाट्याने कमी झाली आहे. आगामी कालावधीमध्ये भारतीय संघाला आणखी सहा सामने खेळायचे असून त्यापैकी किमान चार सामन्यांमध्ये जर यश मिळाले तरच भारतीय संघ कसोटी क्रिकेटविश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवू शकतो. त्यापैकी एक सामना न्यूझीलंडबरोबर मुंबई येथे होणार आहे. तो जरी भारतीय संघाने जिंकला तरी ऑस्ट्रेलिया बरोबर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका होणार आहे त्या पाचपैकी किमान 3 सामने जिंकण्याचे काम भारतीय संघाला करावे लागणार आहे. भारताच्या दौर्यावर आलेल्या न्यूझीलंडला जर भारतीय संघाने मालिकेमध्ये पराभूत केले असते, तर भारताचा मार्ग सोपा झाला असता. पण दोन सामने हरल्यामुळे संपूर्ण गणितच बदलून गेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाने कसोटी क्रिकेटच्या मैदानावर उतरणार्या भारतीय क्रिकेट संघाच्या या आत्मविश्वासाच्या फुग्यालाही टाचणी लागली आहे. सर्वच बाबतीत आता विचार करावा लागणार आहे. शेजारच्याच पाकिस्तान संघामध्ये जेव्हा काही मूलभूत बदल करण्यात आले तेव्हा पाकिस्तान संघाने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाचा दोन सामन्यांमध्ये पराभव केला हे उदाहरण ताजे आहे. बाबर आझमसारख्या अनेक दिग्गजांना पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने संघाबाहेर बसवले आहे. त्यानंतर या संघाने चांगले यश मिळवले. भारतीय संघामध्ये असे मूलभूत बदल करण्याची जरी गरज नसली तरी काही ज्येष्ठ खेळाडूंनी आपल्या लौकिकाला आणि आकडेवारीला साजेसा खेळ करण्याची वेळ आली आहे. फलंदाजी हे भारतीय क्रिकेटचे जरी बलस्थान असले तरी न्यूझीलंडसारख्या संघासमोर ही फलंदाजी टिकू शकली नाही. त्यामुळेच भारताला पराभव पत्करावा लागला. दीर्घकाळ भारतीय फलंदाजी ज्या फलंदाजांच्या खांद्यावर उभी होती त्यापैकी कर्णधार रोहित शर्मा असेल किंवा माजी कर्णधार विराट कोहली असेल त्यांनी या मालिकेमध्ये चांगली कामगिरी न केल्यामुळेच त्याचा फटका बसला असल्याचे लक्षात येते. फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी भारतीय फलंदाज नावाजलेले आहेत त्या फिरकी गोलंदाजी समोरच भारताच्या दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. भारतीय संघातील युवा पिढी जरी चमकदार कामगिरी करत असली, तरी अनुभवाची कमतरता असल्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी त्यांच्याकडून चुका होतात आणि त्याचा फटका सांघिक कामगिरीवर होतो. साहजिकच न्यूझीलंड विरुद्धचा मुंबई येथील तिसरा सामना संपल्यानंतर भारतीय क्रिकेट कसोटी संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर रवाना होईल तेव्हा एका वेगळ्या मानसिकतेतून हे नवीन आव्हान पेलावे लागणार आहे. गेल्या दोन हंगामांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला भारताने धूळ चारली असल्यामुळे त्याचा वाचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ तयारीतच आहे. मायभूमीवरच न्यूझीलंडने भारताला पराभूत केल्यामुळे काही प्रमाणात भारतीय संघाचे मानसिक खच्चीकरणही झाले असण्याची शक्यता आहे. अर्थात, सलग दोन सामन्यातील पराभवामुळे आणि मालिका गमावल्यामुळे जरी भारतीय संघ निराश झाला असला तरी याच निमित्ताने पुन्हा एकदा उभे राहण्याचे आव्हानही त्यांना पेलावे लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या पराभवामुळे भारतीय संघातील कमकुवत बाजू समोर आल्या असून त्यामध्ये सुधारणा करण्याची संधीही त्यामुळे निर्माण झाली आहे. दीर्घकाळ फलंदाजी करण्याची सवयच आता संपुष्टात आली असल्याचा संदेशही या पराभवामुळे दिला आहे. ही सवय नसल्यामुळेच केवळ फलंदाजीच्या जोरावर पराभव टाळणे किंवा विजय मिळवणे या गोष्टी या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला शक्य झाल्या नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे फलंदाज आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहेत, केएल राहुलसारखे फलंदाज संधी मिळूनही कामगिरी करत नाहीत आणि काही तरुण खेळाडूंना जरी संधी मिळाली तरी ते संधीचे सोने करताना दिसत नाहीत. त्यामुळेच कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करणार्या भारताला मायभूमीवरच पराभवाची चव चाखावी लागली. कोणत्याही खेळामध्ये जय आणि पराजय हा अविभाज्य भाग असला तरी अनेकवेळा पराभवामुळे नव्या जिद्दीने पुन्हा आव्हान स्वीकारले जाते. भारतीय संघसुद्धा अशा जिद्दीने आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी तयार होईल अशी आशा करावी लागेल. सतत विजयाचा आस्वाद घेणार्या भारतासारख्या संघाने आता ही पराभवाची चव चाखल्याने कामगिरीत सुधारणा करण्याचा संदेश सर्वच खेळाडूंना मिळाला आहे.