Stock Market Updates: नवीन वर्ष 2024 च्या पहिल्या ट्रेडिंग आठवड्यात, भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात प्राॅफिट बुकींगमुळे मोठ्या घसरणीसह बंद झाला आहे. आयटी आणि धातू समभागात मोठी घसरण दिसून आली. मात्र, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 536 अंकांच्या घसरणीसह 71,356 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 148 अंकांच्या घसरणीसह 21,526 अंकांवर बंद झाला.
आजच्या सत्रात बाजारातील घसरणीला आयटी आणि धातू समभाग कारणीभूत ठरले, यामध्ये जोरदार प्रॉफिट बुकींग दिसून आले. निफ्टीचा आयटी निर्देशांक 888 अंकांनी घसरला आणि 34,395 अंकांवर बंद झाला. धातू समभागातही घसरण दिसून आली. याशिवाय ऑटो, कमोडिटी, बँकिंग समभागही घसरणीसह बंद झाले. तर फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकही हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 10 वाढीसह आणि 20 घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 18 समभाग वाढीसह आणि 32 समभाग घसरणीसह बंद झाले.
मार्केट कॅपमध्ये अल्प घसरण –
शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी बीएसईवर सूचीबद्ध समभागांच्या मार्केट कॅपमध्ये अल्प घसरण झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, बाजाराचे मार्केट कॅप 365.10 लाख कोटी रुपयांवर आले आहे जे गेल्या सत्रात 365.21 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 11 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स –
आजच्या व्यवहारात इंडसइंड बँक 1.69 टक्के, आयटीसी 1.52 टक्के, भारती एअरटेल 1.15 टक्के, एसबीआय 0.68 टक्के, अॅक्सिस बँक 0.65 टक्के, सन फार्मा 0.13 टक्के वाढीसह बंद झाले. टाटा स्टील 3.05 टक्के, इन्फोसिस 2.92 टक्के, विप्रो 2.82 टक्के घसरणीसह बंद झाले.