Share Market Crash: 50 वर्षातील सर्वात मोठी घसरण! अमेरिकेचे शेअर मार्केट कोसळले; भारतीय बाजारावरही परिणाम

USA-India Share Market Crash: अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये गेल्याकाही वर्षातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकेच्या शेअर मार्केटमधील प्रमुख बेंचमार्क इंडेक्स डाओ जोन्स तब्बल 1123 अंकांनी कोसळून 42336.87 अंकांवर बंद झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेल्या कपातीचा परिणाम शेअर मार्केटवरही पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर मार्केटवरही याचे परिणाम दिसून आले आहेत.
50 वर्षात सलग होणारी सर्वात मोठी घसरण
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर पाहायला मिळत आहे. डाओ जोन्ससोबतच नॅसडॅक इंडेक्स देखील 600 अंकांनी कोसळला. डाओ जोन्समध्ये तब्बल 2.6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. या बेंचमार्कमध्ये मागील सलग 10 दिवसांपासून घसरण सुरू आहे. 1974 नंतर पहिल्यांदाच एवढ्या सलगपणे व मोठ्या प्रमाणात डाओ जोन्समध्ये घसरण झाली आहे.
भारतीय शेअर मार्केटवरही परिणाम
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेल्या कपातीचा भारतीय बाजारावर देखील परिणाम पाहायला मिळत आहे. आज (19 डिसेंबर) भारतीय शेअर मार्केट उघडताच मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी घसरून 79,325 अंकांवर आला. तर निफ्टी 320 अंकांनी घसरून 23940 अंकांवर आहे.
मंदीचे सावट
जगभरात महागाई आणि मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. अमेरिकन डॉलरच्या रुपया देखील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकेतील फेडरल बँकेच्या निर्णयाचा भारतासह इतर शेअर मार्केटवर देखील परिणाम दिसून येत आहे. जपानचा निक्केई, कोरियाचा कोस्पी आणि चीनच्या शांघाय कंपोझिट इंडेक्समध्ये घसरण दिसून येत आहे.





