Sheikh Hasina: शेख हसीनांच्या बांगलादेश वापसीसाठी भारताच्या दोन अटी! दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचा दावा
Sheikh Hasina BBC बांगला यांच्या रिपोर्टनुसार, भारताने शेख हसीना यांच्या बांगलादेशातील सुरक्षिततेबाबत विशेष काळजी व्यक्त केली आहे. त्यासाठी बांगलादेश सरकारने स्वतःचे लष्करी विमान पाठवून शेख हसीना यांना मायदेशी घेऊन जावे, अशी भारताची पहिली अट असल्याचे सांगितले जात आहे.

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशात परतण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवण्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, शेख हसीना यांच्या वापसीसाठी भारताने दोन महत्त्वाच्या अटी ठेवल्याची माहिती समोर आली आहे. BBC बांगला यांच्या रिपोर्टनुसार, भारताला शेख हसीना यांच्या सुरक्षेची खात्री आणि त्यांना निष्पक्ष सुनावणीची संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, या दोन अटींवर दोन्ही देशांमध्ये काही प्रमाणात सहमती झाल्याचाही दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, भारत सरकारने या अटींबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही पुष्टी केलेली नाही.
काय आहेत भारताच्या दोन अटी?
BBC बांगला यांच्या रिपोर्टनुसार, भारताने शेख हसीना यांच्या बांगलादेशातील सुरक्षिततेबाबत विशेष काळजी व्यक्त केली आहे. त्यासाठी बांगलादेश सरकारने स्वतःचे लष्करी विमान पाठवून शेख हसीना यांना मायदेशी घेऊन जावे, अशी भारताची पहिली अट असल्याचे सांगितले जात आहे.
भारताची दुसरी अट त्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित आहे. बांगलादेशात २०२४ मधील हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये शेख हसीना यांना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात अपील करण्याची संधी मिळावी, तसेच त्यांच्यावर नव्याने निष्पक्ष खटला चालवण्याची हमी मिळावी, अशी भारताची मागणी असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शेख हसीना यांना योग्य न्याय मिळणे आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित होणे महत्त्वाचे असल्याचे भारताचे म्हणणे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
भारत-बांगलादेशमध्ये चर्चेतून सहमती?
रिपोर्टनुसार, शेख हसीना यांच्या बांगलादेशातील वापसीबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. भारतातील संबंधित अधिकारी आणि बांगलादेशातील अधिकाऱ्यांमध्ये या विषयावर संपर्क असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, शेख हसीना यांच्या प्रकरणाची सुनावणी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि प्रसारमाध्यमांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी भारताची अपेक्षा असल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. दोन्ही देशांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतरच शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याबाबत वक्तव्य केल्याचा दावा BBC बांगलाच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Sheikh Hasina
वापसीसाठी लष्कराची भूमिका महत्त्वाची
शेख हसीना यांना बांगलादेशात परत नेण्यासाठी दोन पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. पहिला पर्याय म्हणजे बांगलादेशने त्यांच्यासाठी लष्करी विमान पाठवणे. तर दुसरा पर्याय म्हणजे भारत-बांगलादेश सीमेवरील एखाद्या निश्चित ठिकाणी त्यांना बांगलादेशी लष्कराच्या ताब्यात देणे. या प्रक्रियेसाठी दोन्ही देशांमधील लष्करी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांमधील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. रिपोर्टनुसार, आवश्यक व्यवस्था करण्यासाठी भारत तयार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
ऑगस्ट २०२४ पासून भारतात वास्तव्यास
शेख हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनानंतर देश सोडून भारतात आल्या होत्या. तेव्हापासून त्या भारतात वास्तव्यास आहेत. त्यांच्या कार्यकाळातील २०२४ मधील हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांवर बांगलादेशात न्यायालयीन कारवाई सुरू झाली.
नोव्हेंबर २०२५ मध्ये बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी शेख हसीना यांना दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर बांगलादेशने भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
दरम्यान, शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याबाबत वक्तव्य केल्याचे वृत्त आहे. तसेच, त्यांनी नव्या पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रासाठी अर्ज केल्याचाही दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
एकूणच, शेख हसीना यांच्या संभाव्य वापसीमुळे भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत. मात्र, भारताने कथित दोन अटी ठेवल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने या घडामोडींवर पुढे काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




