Ashok Mittal: अशोक मित्तल कोण आहेत? EDच्या धाडीनंतर 10 दिवसांत ‘आप’ सोडून भाजपमध्ये प्रवेश, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
Ashok Mittal: आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदारांमध्ये राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे.

Ashok Mittal: पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा खासदार आणि ‘लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’चे (LPU) कुलपती अशोक मित्तल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दहा दिवसांपूर्वीच सक्तवसुली संचालनालयाने (ED) मित्तल यांच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर अचानक त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
व्यावसायिक कुटुंबात जन्म –
अशोक मित्तल यांचा जन्म जालंधर कॅंटमधील एका व्यावसायिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील बलदेव राज मित्तल यांनी ‘लव्हली स्वीट्स’ या नावाने मिठाईचा व्यवसाय सुरू केला होता, जो पुढे अशोक मित्तल आणि त्यांच्या भावांनी मोठ्या शिखरावर नेऊन ठेवला. १९९१ मध्ये त्यांनी ‘लव्हली ऑटो’द्वारे वाहन क्षेत्रात पाऊल ठेवले आणि २००० मध्ये शिक्षण क्षेत्रात प्रवेश करत ‘लव्हली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ची स्थापना केली. २००५ मध्ये त्यांनी स्थापन केलेली ‘लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’ आज उत्तर भारतातील एक नामांकित खासगी विद्यापीठ मानले जाते.
राजकीय प्रवास २०२२ मध्ये सुरू –
मित्तल यांचा राजकीय प्रवास २०२२ मध्ये सुरू झाला, जेव्हा ‘आप’ने त्यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवले. संसदेत त्यांनी नेहमीच पंजाब सरकारच्या कामांची पाठराखण केली आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला धारेवर धरले. नुकतीच पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत राघव चड्ढा यांच्या जागी राज्यसभेतील पक्षाचे उपनेते म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. पक्षात त्यांचे महत्त्व वाढत असतानाच त्यांच्यावर ईडीची वक्रदृष्टी पडली.
निवासस्थानांसह शैक्षणिक संस्थांवर छापे –
गेल्या १५ एप्रिल रोजी ईडीने विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) कथित उल्लंघनाप्रकरणी मित्तल यांच्या जालंधर आणि फगवाडा येथील निवासस्थानांसह शैक्षणिक संस्थांवर छापे टाकले होते. या चौकशीत त्यांचे चिरंजीवही रडारवर आले होते. या कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने याला ‘वॉशिंग मशीन’ राजकारणाचा भाग म्हटले जात आहे.
राज्यसभेत ‘आप’साठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण 24 तासात आतापर्यंत राघव चड्ढांसह पक्षाचे सात खासदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामुळे राज्यसभेतील संख्याबळावर परिणाम होऊन कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत सत्ताधारी भाजपची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. मित्तल यांच्या या प्रवेशामुळे पंजाबमधील आगामी स्थानिक निवडणुकांवर आणि ‘आप’च्या प्रतिमेवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आपचे हे 7 खासदार भाजपमध्ये –
आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदारांमध्ये राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे.





