India-Oman FTA : भारत-ओमान मुक्त व्यापार कराराने ऊर्जा, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्राला बळ
India-Oman FTA : तज्ज्ञांच्या मते, ओमानसोबतचा मुक्त व्यापार करार भारताची ऊर्जा आणि आर्थिक सुरक्षा मजबूत करेल. दोन्ही देशांमधील हा व्यापार करार 1 जून रोजी लागू करण्यात आला.

India-Oman FTA : तज्ज्ञांच्या मते, ओमानसोबतचा मुक्त व्यापार करार भारताची ऊर्जा आणि आर्थिक सुरक्षा मजबूत करेल. दोन्ही देशांमधील हा व्यापार करार 1 जून रोजी लागू करण्यात आला.
ओमान हा आखाती प्रदेशात भारताच्या सर्वात विश्वासार्ह भागीदारांपैकी एक राहिला आहे, असे ’थिंक टँक सीआरएफ’चे अध्यक्ष शिशिर प्रियदर्शी म्हणाले. भारत तेल, वायू आणि पेट्रोकेमिकल्सवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने, ओमानसोबतचे आर्थिक एकीकरण भारताच्या ऊर्जेच्या गरजांसाठी उपयोगी ठरणार आहे.
अमेरिका-इराण युद्ध आणि त्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कृषी उत्पादने आणि ऊर्जा उत्पादनांसह सर्व क्षेत्रांतील पुरवठा साखळीत व्यत्यय आला आहे. भारतीय व्यवसायांसाठी पश्चिम आशियामध्ये ओमान उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि पुनर्निर्यात केंद्र म्हणूनही काम करू शकते.
या मुक्त व्यापार कराराचे महत्त्व द्विपक्षीय व्यापाराच्या आकड्यांपेक्षा मोठे आहे. अशाच मतांना दुजोरा देत, आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ञ आणि हाय-टेक गिअर्सचे अध्यक्ष दीप कपूरिया म्हणाले की, या व्यापार कराराच्या अंमलबजावणीमुळे भारताला केवळ ओमानमध्येच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशिया प्रदेशात आपला बाजारहिस्सा वाढविण्यात मदत होईल.
या व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून ओमानला होणार्या सर्व निर्यातीवर शून्य-शुल्क बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे, तसेच कमी केलेल्या अनुपालन आवश्यकतांमुळे, भारतीय निर्यातदार ओमानमधील विविध उत्पादन विभागांमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ओमान ही तुलनेने लहान बाजारपेठ असली तरी, ती अभियांत्रिकी, फार्मा, कृषी, अन्न प्रक्रिया, सागरी उत्पादने, वस्त्रोद्योग, रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, रत्ने आणि दागिने यांसारख्या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देते.
मस्कतचा बराचसा किनारा होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाहेर आहे. यामुळे प्रादेशिक संघर्ष, अशांतता किंवा भू-राजकीय अस्थिरतेच्या काळातही ते भारतासाठी एक विश्वसनीय व्यापार आणि ऊर्जा केंद्र म्हणून कायम राहू शकते, असे थिंक टँक जीटीआरआयने म्हटले आहे.





