वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच १२१ देशांची एक महत्त्वाची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये अमेरिकेत स्थायिक झालेल्या विविध देशांतील नागरिकांना तिथल्या सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा (Welfare Support) तपशील दिला आहे. विशेष म्हणजे, या यादीत पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांसारख्या शेजारील देशांचा समावेश आहे, मात्र भारताचे नाव या यादीत कुठेही नाही. भारतीय अमेरिकन सर्वाधिक प्रगत – ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक चार्ट शेअर केला आहे. यातून असे समोर आले आहे की, भारतीय-अमेरिकन लोक आता अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आणि स्वावलंबी समाज बनले आहेत. २०२३ च्या आकडेवारीनुसार, भारतीय कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १.५१ लाख डॉलर्स (सुमारे १ कोटी २५ लाख रुपये) इतके आहे. हे उत्पन्न अमेरिकेतील इतर कोणत्याही आशियाई समुदायापेक्षा जास्त आहे. भारतीय लोक सरकारी अनुदानावर अवलंबून नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. याउलट, बांगलादेशातून आलेल्या ५४.८% कुटुंबांना आणि पाकिस्तानातून आलेल्या ४०.२% कुटुंबांना अमेरिकन सरकारची मदत घ्यावी लागते. “रशियन तेलावरून मोदींना ठाऊक होते की मी नाराज आहे” – ट्रम्प एकीकडे भारतीयांच्या प्रगतीचे कौतुक होत असताना, दुसरीकडे व्यापार आणि रशियन तेलाच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी कडक भूमिका घेतली आहे. फ्लोरिडावरून वॉशिंग्टनला जाताना विमानातील पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला. ट्रम्प म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे एक चांगले आणि प्रामाणिक मनाचे व्यक्ती आहेत. त्यांना माहित होते की रशियाकडून तेल विकत घेतल्यामुळे मी त्यांच्यावर नाराज होतो. अमेरिकेला खुश ठेवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण जर आम्ही भारतावर ‘टॅरिफ’ (व्यापार शुल्क) वाढवले तर ते त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप नुकसानकारक ठरेल.” टॅरिफचा दबाव आणि रशियन तेल – अमेरिकन खासदार लिंडसे ग्रॅहम यांनीही यावर भाष्य केले. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियाच्या ग्राहकांवर (जसे की भारत) दबाव टाकणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प सरकारने भारतावर लावलेल्या २५% अतिरिक्त शुल्कामुळे भारताने आता रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचेही ग्रॅहम यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी आपल्या कष्टाने तिथे दबदबा निर्माण केला आहे. मात्र, जागतिक राजकारणात रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेने भारतावर व्यापारी दबाव कायम ठेवला आहे.