Rajnath Singh : भारत सुरक्षेच्या आघाडीवर भाग्यवान नाही – राजनाथ सिंह

महू : भारत सुरक्षाविषयक आघाडीवर फारसा भाग्यवान देश नाही. त्यामुळे शत्रूंविरोधात सतर्क रहा, अशा सूचना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लष्करी जवानांना दिल्या. मध्यप्रदेशातील महू छावणीत राजनाथ यांनी जवानांशी संवाद साधला. सुरक्षा स्थिती विचारात घेता आपल्या उत्तर सीमेवर आणि पश्चिम सीमेवर सातत्याने आव्हाने उभी असतात.
अंतर्गत आघाडीवरही आपल्याला आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण स्वस्थ, निश्चिंत बसू शकत नाही. आपले शत्रू, मग ते अंतर्गत असोत की बाहेरील, नेहमी सक्रिय असतात. अशा स्थितीत शत्रूंच्या हालचालींवर बारीक नजर ठेवायला हवी. त्यांच्या विरोधात वेळीच आणि योग्य पाऊले उचलायला हवीत. भारताला विकसित आणि स्वावलंबी देश बनवण्यासाठी लष्कराची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे.
आपण सदैव सतर्क राहणे गरजेचे आहे. जवान अतिशय शिस्तीने आणि समर्पित वृत्तीने प्रशिक्षण घेत आहेत. ते पाहून मी अतिशय प्रभावित झालो. जवानांचे प्रशिक्षण कुठल्या युद्धापेक्षा कमी नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.





