नवी दिल्ली – भारत तांदूळ उत्पादनात जगातील सर्वात मोठा देश ठरला आहे. पहिल्या क्रमांकावरील चीनने आता दुसर्या क्रमांकाची जागा घेतली असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. भारतात 150.18 दशलक्ष टन तांदूळ उत्पादन झाले आहे. चीनमधील तांदूळ उत्पादन भारतापेक्षा कमी म्हणजे 145.28 दशलक्ष टन झाले आहे. त्यामुळे भारतातील अन्नसुरक्षितता कमालीची वाढली आहे आणि आगामी काळात भारत जगातील अनेक देशांना अन्नधान्याचा पुरवठा करू शकणार आहे. शेतकर्यांना अधिक उत्पादन देणारे बी बियाणे पुरविण्यासाठी 2014 पासून केंद्र सरकारने प्रयत्न वाढविले आहेत. 2014 पासून अशा प्रकारच्या 3,236 बियाण्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 1969 ते 2014 दरम्यान अशा प्रकारच्या केवळ 3,969 बियाण्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली होती. भारतीय बियाणे मंडळ देशातील आणि परदेशातील संशोधन करणार्या संस्थाबरोबर काम करून जगातील सर्वोत्कृष्ट बियाणे कमीत कमी किमतीमध्ये भारतीय नागरिकांना पुरविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे भारतातील कृषी क्षेत्राची उत्पादकता झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये मका, गह, साखर इत्यादीचे उत्पादन वेगाने वाढत असल्यामुळे या कृषी उत्पादनांची निर्यात वाढत आहे. त्यामुळे भारताला परकीय चलन उपलब्ध होण्यास मदत मिळत आहे. डाळी आणि तेलबिया या क्षेत्रातील परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र या क्षेत्रात आणखी प्रयत्न करण्याची गरज असून त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने जाहीर केलेल्या सुधारित रोजगार हमी योजनेमुळे शेतीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. मात्र काँग्रेस सरकार याबाबत अपप्रचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.