Vehicle sales : सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक वाहनविक्रीचा नवा विक्रम; तब्बल 52 टक्क्यांची वाढ
Vehicle sales : भारतात ४२ दिवसांच्या सणासुदीत ५५.२५ लाख वाहनांची विक्री झाली. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री ५२.६२ टक्क्यांनी वाढली, तर कारविक्रीत ७.१६ टक्क्यांची घट झाली.

Vehicle sales : देशात यंदाच्या सणासुदीच्या काळात वाहनविक्रीने नवा विक्रम नोंदवला आहे. नवरात्रीपासून धनत्रयोदशीनंतरच्या १५ दिवसांपर्यंतच्या ४२ दिवसांत देशात एकूण ५५ लाख २५ हजार ४९० वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २.२१ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री ५२.६२ टक्क्यांनी वाढून ५ लाख ९ हजारांवर पोहोचली. मात्र, प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७.१६ टक्क्यांची घट झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा) यांनी ही माहिती दिली.
प्रत्येक १० वाहनांमागे एक इलेक्ट्रिक – (Vehicle sales )
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने यंदा विशेष लक्ष वेधले. सणासुदीच्या ४२ दिवसांत एकूण ५ लाख ९ हजार ६६७ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच काळात ३ लाख ३३ हजार ९३५ इलेक्ट्रिक वाहने विकली गेली होती. म्हणजेच विक्रीत ५२.६२ टक्क्यांची वाढ झाली. इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री ६१.१० टक्क्यांनी, तर इलेक्ट्रिक कारची विक्री ७२.९१ टक्क्यांनी वाढली. इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. त्यामुळे यंदा विकल्या गेलेल्या प्रत्येक १० वाहनांपैकी जवळपास एक वाहन इलेक्ट्रिक होते.
कारच्या विक्रीत ७ टक्क्यांची घट – (Vehicle sales )
एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत असताना दुसरीकडे प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीत घट झाली. यंदा ७ लाख ४८ हजार ६१६ प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी हा आकडा ८ लाख ६ हजार ३२२ होता. त्यामुळे विक्रीत ७.१६ टक्क्यांची घट झाली. मात्र, २०२४ मधील सणासुदीच्या तुलनेत प्रवासी वाहनांची विक्री अजूनही १६.४३ टक्क्यांनी जास्त आहे.
दुचाकींच्या विक्रीत ३.६७ टक्के, तीनचाकी वाहनांत ५.३२ टक्के आणि व्यावसायिक वाहनांत ७.१३ टक्के वाढ झाली. ट्रॅक्टर विक्रीत २.२४ टक्के, तर बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक २६.०६ टक्के वाढ नोंदवली गेली.
इलेक्ट्रिक वाहनांचा पुरवठा कमी – (Vehicle sales )
इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांकडून चांगली मागणी असली, तरी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने विक्रीवर मर्यादा आल्या. फाडाचे अध्यक्ष साई गिरिधर यांच्या मते, इलेक्ट्रिक दुचाकी आणि कारचा पुरवठा कमी होता. पुरेशी वाहने उपलब्ध असती, तर आणखी ६० ते ७० हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असती. पुरवठ्यातील अडचणींमुळे इलेक्ट्रिक वाहनांचा एकूण वाहनविक्रीतील वाटा ९ टक्क्यांच्या आसपास राहिला. पुरवठा चांगला असता, तर हा वाटा ११ टक्क्यांपेक्षा जास्त झाला असता, असे त्यांनी सांगितले.
वर्षभरात ३ कोटी वाहनविक्रीचा अंदाज – (Vehicle sales )
फाडाच्या अंदाजानुसार, २०२६ या कॅलेंडर वर्षात देशातील वाहनविक्री प्रथमच ३ कोटींचा टप्पा ओलांडू शकते. वर्षअखेरीस ३.१ ते ३.२ कोटी वाहनांची विक्री होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रवासी वाहनांची वार्षिक विक्रीही प्रथमच ५० लाखांचा टप्पा पार करू शकते. जीएसटी २.० मुळे वाहनांच्या किमतीत झालेली घट, ग्राहकांची मागणी आणि इलेक्ट्रिक वाहनांचे वाढते पर्याय यामुळे वाहन उद्योगाला चालना मिळत असल्याचे फाडाने म्हटले आहे.





