#INDvENG 3rd T20 : आघाडी घेण्यासाठी भारत सज्ज

अहमदाबाद – दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली असली तरीही आज होत असलेल्या तिसऱ्या सामन्यातील विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारत व इंग्लंड या दोन्ही संघात चांगलीच चुरस रंगण्याची अपेक्षा आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात झालेल्या चुका विसरून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात अचूक संघ निवडीला प्राधान्य देणार की पुन्हाएकदा प्रयोगच करणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.
पहिल्या सामन्यानंतर सलामीवीर शिखर धवन व अक्सर पटेल यांना बाहेर काढत इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली. त्यात किशनने अर्धशतकी खेळी करून पदार्पण गाजवले मात्र, धवनला सातत्याने अपयश येत असतानाही त्यालाच का वारंवार संधी दिली जाते, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. त्यातच कोहलीला येत असलेले अपयशही चिंता वाढवणारे होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने 73 धावांची अफलातून खेळी केली व आपण भरात येत असल्याचा इशाराही दिला.
पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने महत्त्वपूर्ण फलंदाजी केल्यामुळे आपल्याला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. दुसऱ्या सामन्यात किशन व कोहली खेळले म्हणून विजय सोपा झाला; पण तरीही गेल्या अनेक महिन्यांपासून मर्यादित षटकांच्या सामन्यात आपल्याला आश्वासक सलामी मिळालेली नाही. त्यामुळे कोहलीही फारसे प्रयोग न करता अनुभव व नवोदित यांच्यात योग्य समतोल राखणार का यावरच आता या मालिकेचे भवितव्य आहे.
गोलंदाजीत भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे पण पटेल सातत्याने चांगली कामगिरी करत असूनही यजुवेंद्र चहलला खेळवत राहणे अनेकांना संभ्रमात टाकणारे ठरत आहे. भुवनेश्वर कुमार या मालिकेत पूर्ण तंदुरुस्त होऊन सहभागी झाल्याने संघाला दिलासा मिळाला असला तरीही शार्दुल ठाकूर व हार्दिक पंड्या यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पहिल्या दोन्ही सामन्यांत पूर्ण झालेल्या नाहीत. तिसऱ्या सामन्यात तरी पंड्याला सूर गवसतो का यावरच भारतीय संघाच्या यशापयशाची टक्केवारी अवलंबून आहे. कोहली भरात आला हे संघासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तरीही सलामीला लोकेश राहुलच्या जागी रोहित शर्मा किंवा फलंदाजीत बढती देत सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते असे संकेत मिळत आहेत.
इंग्लंडचा संघ संतुलीत असला तरीही त्यांचा कर्णधार इयान मॉर्गन, बेन स्टोक्स व जोस बटलर यांना येत असलेले अपयश त्यांची चिंता वाढवणारे ठरत आहे. डेव्हिड मलान, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो यांच्यासह सॅम व टॉम कुरेन यांनाही जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. ही मालिका जिंकायची असेल तर त्यांना भारताची सशक्त फलंदाजी पाहता किमान 180 ते 200 धावा करणे आवश्यक आहे. त्यातच त्यांच्या गोलंदाजीत स्टोक्सचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांकडे भारतीय खेळपट्टीवर खेळणे अद्याप जमलेले दिसत नाही. जोफ्रा आर्चर व आदिल रशिद या दोघांवरच त्यांची गोलंदाजी अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी त्यांची षटके संयमानी खेळून काढली तर अन्य गोलंदाजांना लक्ष्य करणे सोपे ठरेल.
हार्दिक पंड्याच्या कामगिरीकडे लक्ष
दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या कामगिरीकडे आता लक्ष लागले आहे. पंड्यासारखे खेळाडू सामन्याला कोणत्याही क्षणी कलाटणी देऊ शकतात. पंड्या हा आक्रमक फलंदाज असल्यामुळे 6 ते 15 या षटकांच्या मध्ये षटकामागे 10 किंवा 12 च्या सरासरीने धावा करणे त्याला कठीण नाही. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यात त्याची फलंदाजी पाहता त्याला अद्याप सूर गवसलेला नाही. आता या मालिकेतील उर्वरीत तीनही सामन्यात त्याची कामगिरी भारतासाठी महत्वाची ठरणार आहे.





