India-China troops clash: “संरक्षण करता येत नसेल तर खुर्ची सोडा”; सभागृहात जोरदार गदारोळ

नवी दिल्ली- तवांग सेक्टरमध्ये झालेल्या झटापटीच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत जोरदार गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी सरकाला लक्ष्य केले. चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी केली आहे. 2020 मध्येही त्यांनी अशीच घुसखोरी केली होती. मात्र घुसखोरी झाली नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळीही केला होता.
किंबहुना भारताच्या हद्दीतून माघार घेण्याच्या संदर्भात चीनसोबत सुरू असलेलली चर्चाही थांबली आहे आणि कोणती नवी तारीखही सांगण्यात आलेली नाही. गलवानची घटना जूनमध्ये घडली. त्या अगोदरची म्हणजे एप्रिल 2020 ची स्थिती पुन्हा बहाल केली जावी अशी मागणी करूनही चीनने अद्याप आपल्या भूमीवरचा ताबा सोडलेला नाही अशी टीका खर्गे यांनी केली.
संरक्षण करता येत नसेल तर खुुर्ची सोडा
केंद्र सरकारवर टीका करताना कॉंग्रेस नेते अधिररंजन चौधरी म्हणाले की, एकदा पंतप्रधान केअर फंडचाच आढावा घेतला जावा. त्यात किती लोकांनी कित्या देणग्या दिल्या आहेत त्याची माहिती घेतली जावी आणि देणग्या देणाऱ्यांमध्ये किती चीनी कंपन्या आहेत त्याचीही माहिती काढली जावी. रात्री 12 वाजताच गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन दिले. मात्र सीमेवर काहीही झालेले नाही हे अमित शहा यांनी कोणत्या अधिकाराने सांगितले? गृहमंत्री जर स्वत:चे संरक्षण करू शकत नसतील त्यांनी खुर्ची खाली करावी.
दोन्ही सभागृहांत आज याच प्रकरणावरून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना सरकारकडून लोकसभेत 12 वाजता तर राज्यसभेत 12.30 मिनिटांनी निवेदन जारी करण्यात आले आहे. भारतीय लष्कराची कोणतीच हानी झाली नसल्याचे दोन्ही सदनांत स्पष्ट करण्यात आले आहे.





