Auto Sales July 2026: ऑटोमोबाईल बाजाराची भरारी! वाहन विक्रीत 26% वाढ, इलेक्ट्रिक सुसाट
Auto Sales July 2026: फाडाच्या अहवालानुसार जुलै 2026 मध्ये भारतातील ऑटोमोबाईल किरकोळ विक्रीत 25.89% वाढ झाली. इलेक्ट्रिक वाहनांची विक्रमी विक्री, दुचाकी आणि प्रवासी वाहनांच्या मागणीत मोठी वाढ, तसेच जीएसटी 2.0 मुळे बाजाराला मिळालेली चालना जाणून घ्या.

Auto Sales July 2026: गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात जीएसटीच्या सुसूत्रीकरणानंतर मागणीत आलेली गती कायम ठेवत, भारतातील एकूण ऑटोमोबाईल किरकोळ विक्री जुलैमध्ये वार्षिक पातळीवर 25.89 टक्क्यांनी वाढून 25,91,138 युनिट्सवर पोहोचली, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्सने (फाडा) सांगितले.
गेल्या वर्षी जुलैमध्येकिरकोळ विक्री 20,58,325 युनिट्स होती. प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री गेल्या महिन्यात 4,16,555 युनिट्स होती, तर जुलै 2025 मध्ये ती 3,49,674 युनिट्स होती. म्हणजेच 19.13 टक्क्यांची वाढ झाली.
यावर्षी जुलैमध्ये दुचाकींची विक्री 18,18,289 युनिट्सवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या याच महिन्यातील 14,17,767 युनिट्सच्या तुलनेत 28.25 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या महिन्यात तीनचाकींची विक्री 1,33,778 युनिट्सवर पोहोचली. जी जुलै 2025 मधील 1,15,166 युनिट्सच्या तुलनेत 16.16 टक्क्यांची वाढ आहे.
व्यावसायिक वाहनांच्या किरकोळ विक्रीतही 24.04 टक्क्यांची वाढ झाली असून, ती गेल्या महिन्यात 99,666 युनिट्सवर पोहोचली. जी जुलै 2025 मधील 80,348 युनिट्सच्या तुलनेत अधिक आहे.
फाडाचे उपाध्यक्ष साई गिरीधर म्हणाले की, दुचाकी, तीनचाकी, व्यावसायिक वाहने, प्रवासी वाहने, ट्रॅक्टर आणि चाकी बांधकाम उपकरणे या प्रत्येक श्रेणीने जुलै महिन्यात आतापर्यंतची सर्वोत्तम विक्री नोंदवण्याची ही पहिलीच वेळ आहे.डीलर या गतीचे श्रेय जीएसटी 2.0 मुळे आलेली परवडणारी किंमत, किरकोळ वित्तपुरवठ्याची सुलभता आणि सणासुदीच्या अनुकूल वेळेला देतात.
प्रवासी वाहन बाजारात पर्यायी इंधने आता पेट्रोलच्या अगदी जवळ पोहोचली आहेत. पर्यायी इंधनाचा वाटा (सीएनजी – 24.67 टक्के, हायब्रीड 8.02 टक्के, ईव्ही 7.9 टक्के) 40.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. जो पेट्रोलच्या 41.68 टक्क्यांपेक्षा केवळ 1.09 टक्के कमी आहे. हे अंतर केवळ एका वर्षापूर्वी 13.21 टक्क्यांचे होते. यामुळे येत्या काही महिन्यांत एक ऐतिहासिक बदल घडून येण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रीक वाहनांचे प्रमाण वाढले –
दुचाकी विभागात, गिरीधर म्हणाले की इलेक्ट्रिक दुचाकींचा वाटा एका वर्षापूर्वीच्या 7.65 टक्क्यांवरून विक्रमी 11.24 टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण ईव्ही किरकोळ विक्री 3,27,901 युनिट्सवर पोहोचली आहे, जी ’इतिहासातील कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक’ आहे. एकूण ईव्ही वापराचे प्रमाण एका वर्षापूर्वीच्या 9.6 टक्क्यांवरून सुमारे 12.7 टक्क्यांवर पोहोचले आहे.





