चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. उद्यापासून म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे तर भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. असं असलं तरी भारत आणि पाकिस्तान या सामन्याची उत्सुकता संपूर्ण क्रीडा रसिकांना असते. कारण हे दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतात.
..तर भारत आणि पाकिस्तानमध्ये दोनदा होऊ शकतो सामना
भारत आणि पाकिस्तान हा सामना 23 फेब्रुवारीला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोनदा सामना होण्याची शक्यता आहे. यामागे काय समीकरण आहे जाणून घेऊया… दोन्ही देश अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात. त्याचं गणित असं की, दोन्ही साखळी फेरीत एकाच गटात आहेत. दोन्ही देशांनी उपांत्य फेरी गाठली आणि अंतिम फेरीत पोहोचले तर हे समीकरण शक्य आहे. असंच समीकरण 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीत जुळून आलं होतं.
2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काय घडले?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना पार पडला होता.तेव्हा भारताने पाकिस्तानला 124 धावांनी पराभूत केलं होतं. उपांत्य फेरीत तेव्हा भारत विरुद्ध बांग्लादेश आणि पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा सामना झाला. उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान यांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत एकमेकांसमोर दुसऱ्यांदा उभे ठाकले. मात्र अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी दोन्ही संघांचे खेळाडू
भारत : श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह और वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान : फखर जमान, सऊद शकील, मोहम्मद रिजवान (कर्णधार), बाबर आजम, खुशदिल शाह, फहीम अशरफ, अबरार अहमद, शाहीन शाह अफरीदी, नसीम शाह, कामरान गुलाम, तैयब ताहिर, सलमान अली आगा, मुहम्मद हसनैन और हारिस रऊफ.