#INDvENG ODI Series : गहुंजे स्टेडियम सज्ज

पुणे – भारत व इंग्लंड यांच्यात पुण्यात होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे स्टेडियम सज्ज बनले आहे. या सामन्यासाठी मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी प्रेक्षकांना देण्यात आलेली नसली तरी अखेर माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रेसबॉक्समध्ये सामन्याचे वार्तांकन करण्याची परवानगी मात्र, देण्यात आली आहे.
इंग्लंडचा संघ कसोटी, टी-20 व एकदिवसीय अशा तिनही प्रकारात सामने खेळण्यासाठी भारतात दाखल झाला होता. कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत तर उर्वरीत दोन सामने तसेच संपूर्ण टी-20 मालिका अहमदाबादमध्ये खेळवली गेली. आता संपूर्ण एकदिवसीय सामन्यांची मालिका पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे. पुण्यासह संपूर्ण राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढला असल्याने हे सामने पुण्यात होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र, अखेर बीसीसीआयने हे सामने पुण्यातच होणार असल्याचा निर्वाळा दिला. इंग्लंडमधील हाफकिन आर्किटेक्टने रचना केलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता 37 हजार असली तरीही या मालिकेतील सामने खुर्च्या रिकाम्या ठेवून बंद दाराआडच खेळवले जाणार आहेत.
या सामन्यासाठी दोन्ही संघांचे शहरात आगमन झाले असून लगेचच दोन्ही संघांचे सराव सत्रही आयोजित करण्यात आले आहे. मात्र, नेहमीप्रमाणे सराव सत्र पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांना मज्जाव करण्यात आला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधिंना परवानगी असली तरीही त्यांना प्रेसबॉक्स सोडून अन्यत्र जाण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.
कोहलीसाठी लकी मैदान…
भारतीय संघासाठी तसेच कर्णधार विराट कोहलीसाठी हे मैदान सातत्याने लकी ठरले आहे. 2019 साली कोहलीने याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत द्विशतक फटकावले होते. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांत त्याने शतकी खेळी केली होती. आता या मालिकेतही कोहलीकडून अशाच कामगिरीची अपेक्षा राहणार आहे.





