“दिल्लीतील अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमात इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन; राजकीय संजीवनीची चर्चा”

नवी दिल्ली, – राज्यात पुन्हा स्थानिक निवडणूकाचे बिगुल वाजणार आहेत. अशात राजधानीत अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीला इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन उद्या, शनिवारी दिसणार आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीतील बडे नेते उद्या शनिवारी राजधानीत एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. महत्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचे अस्तित्व संपुष्टात आले असे बोलले जात होते. शिवाय पहलगामवर सर्वच विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे या कार्यक्रमाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये उद्या शनिवारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचीही येण्याची शक्यता आहे. यामुळे, जयंतीदिनाच्या कार्यक्रमात इंडिया आघाडीला नव्याने संजीवनी मिळणार असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. यात सहभागी होण्यासाठी गुजरात आणि उत्तरप्रदेशासह पाच राज्यांतून रथयात्रा दिल्लीत आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सन्मानजनक जागा दिल्या तर आपण महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढू, असे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.





