सांगवीत कलाटे यांचे शक्‍तिप्रदर्शन!

पिंपरी – विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निष्क्रियतेला नागरिक कंटाळले आहे. गेल्या पाच वर्षात चिंचवड मतदारसंघातील समस्या जैसे थे’ असून त्यांना नागरिकांच्या समस्यांचे काहीही देणे-घेणे नाही. त्यामुळे अशा असंवेदनशील आणि निष्क्रिय आमदाराला घरी बसविण्याची वेळ आली असून येत्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हेच आमदार म्हणून निवडून येणार, असा विश्‍वास सांगवीतील नगरसेवक नवनाथ जगताप यांनी व्यक्त केला.

नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे गुरव आदी परिसरात अपक्ष उमेदवार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत राहुल कलाटे यांची भव्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यावेळी सांगवीतील नगरसेवक नवनाथ जगताप बोलत होते.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे आजी माजी पदाधिकारी एकवटल्याचे चित्र दिसले. या दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे कलाटे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन झाले.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, शाम जगताप, राजेंद्र जगताप, तानाजी जवळकर, सुनिल ढोरे, अमर अदित्य, शिवाजी पाटोळे, बाळासाहेब पिलेवाट, सुरेश सकट, बाळासाहेब सोनवणे, प्रकाश ढोरे, पंकज कांबळे, निखील चव्हाण, अमरसिंह आदियाल यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

नवनाथ जगताप म्हणाले की, विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात नागरिकांना निव्वळ आश्‍वासनांचे गाजर दाखवले आहे. शास्तीकर, अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न, शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याच्या घोषणा करून नागरिकांचे मन परिवर्तन करण्याचा निवडणुकी आधी प्रयत्न केला. मात्र, त्यातही ते अपयशी ठरले आहेत. चिंचवड हा उच्चशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे, कुठलीही गुंडगिरी आणि आमिषाला बळी न पडता राहुल कलाटे यांनाच मोठ्या संख्येने विजयीकरा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, मुबलक पाणी असूनही वाकड, पिंपळे निलख येथे मोठ्या प्रमाणात पाणी समस्या निर्माण झाली आहे. हिंजवडी, वाकड, सांगवी या भागात गुन्हेगारी वाढत आहे. याकडे आमदार लक्ष देत नाहीत. हे सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी आता आपण राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनाच निवडून देणार, अशी खात्री काटे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी पुरस्कृत आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने राहुल कलाटे यांना बॅटच्या चित्रासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.