पुणे जिल्हा | विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी एसएफआयचे बेमुदत धरणे सुरू

मंचर, (प्रतिनिधी) – अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही विद्यार्थी वसतिगृहाविना असल्याकारणाने एसएफआयचे घोडेगाव तालुका आंबेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरू करून शासनाचे लक्ष वेधले आहे.
आश्रमशाळांच्या पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळावा. इत्यादी कारणांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)च्या वतीने सोमवार, दि. ७ ऑक्टोबरपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले.
वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश देण्यात यावा, एकलव्य कुशल पोर्टलवर एमएससीआयटी, टॅली, टाइपिंग जेईई, नीट या कोर्सचा समावेश करण्यात यावा.
आश्रमशाळा व वसतिगृहातील पायाभूत सुविधांचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा. या व अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरूच आहे.दि. ६ आॅगस्ट रोजी संघटनेने घोडेगाव प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते.
या आंदोलनास प्रकल्प अधिकारी यांनी समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या घटनेला महिना होत आलेला आहे. तसेच दि.२९ व ३० आॅगस्ट रोजी संघटनेने नाशिक आयुक्त कार्यालय नाशिकच्या समोर देखील उलगुलान मोर्चा केला होता.
या आंदोलनास देखील आयुक्त कार्यालयाने लेखी आश्वासन दिलेले आहे. तसेच सबंधित कार्यालयांना पत्राद्वारे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निर्देश देखील दिलेले आहेत. संघटनेने महिनाभर सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
तरी देखील रिक्त जागा असून देखील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत नाहीत. यामुळे संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व एसएफआय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, पुणे जिल्हा अध्यक्ष दीपक वालकोळी, सचिव नवनाथ मोरे, सहसचिव समीर गारे, संदीप मरभळ, निशा साबळे, निकिता मेचकर, बाळकृष्ण गवारी, राजू शेळके, संस्कृती गोडे, समीक्षा केदारी आदी करत आहेत.

