Pune District : ओबीसी मेळाव्यात इंदापूरकरांनी सहभागी व्हावे : शिंदे

इंदापूर : बीड येथील ओबीसी महाएल्गार मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने इंदापूर तालुक्यातील ओबीसी बांधवांनी न्याय हक्कासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी नेते पांडुरंग शिंदे यांनी केले.
बीड येथे शुक्रवार (दि. १७) रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या पूर्वतयाऱ्यांच्या बैठका राज्यभर होत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१३) रोजी शहरातील संत सावतामाळी मंदिरात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे बोलत होते. ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण असताना देखील केवळ राजकीय आरक्षण यांना हवे आहे.
यासाठी मराठा समाजाला आमच्या ओबीसी समाजातून आरक्षण पाहिजे आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे मूळ ओबीसी घटकांना वंचित ठेवणारे ठरणार असून या संस्था तीव्र विरोध असून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी बीड या ठिकाणी येत्या शुक्रवारी इंदापूर तालुक्यातून जवळपास ३०० हून अधिक चारेचाकी वाहने स्वखर्चाने ओबीसी बांधव त्या ठिकाणी जाणार आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
या नियोजन बैठकीला इंदापूर तालुक्यातील आणि परिसरातील मोठ्या प्रमाणावरती ओबीसी बांधवांनी उपस्थिती लावली. यावेळी बापूसाहेब भुजबळ, पांडुरंग शिंदे, रमेश शिंदे, बाबजी भोंग, तानाजी धोत्रे, विकास शिंदे, अक्षय शिंदे यांनी उपस्थित ओबीसी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना बीड येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

