प्रभात वृत्तसेवा वडापुरी ( विजय शिंदे ) – इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजल्याने ग्रामीण भागात वातावरण तापायला लागले आहे. पक्ष निश्चित नाही, उमेदवार ठरले नाहीत, पॅनलची आखणीही सुरू नाही, तरीपण प्रचार मात्र जोमात सुरू झाला आहे.इंदापूर तालुक्यातील गावागावात सध्या मीच पुढचा सदस्य असल्याचे रुजवण्याची मोहीम सुरू आहे. कोणी हळूच अंगनात चहा घेत बसलेले, तर कोणी रात्री गुप्त गाठीभेटी घेत, पक्ष नेत्यांकडे आपली शिफारशीचे पै पाहुण्यांकडे शब्द टाकत आहेत. तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी व इतर संघटना एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याची झलक इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर दिसून येत आहे. महाविकास आघाडी, महायुती या दोन्हींमध्ये स्थानिक पातळीवर युती होणार नाही, हे निश्चित झाले आहे.इंदापूरच्या राजकारणात अनेक घडामोडी घडणार असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीतच निवडणुकीची शिट्टी वाजणे बाकी असून मैदानावर गलबला सुरू झाला आहे. त्यामुळे होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोण कोणावर भारी पडतं? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवानंतर कार्यकर्ता अस्वस्थ होता. याउलट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांची मागणी वाढली होती. परंतु, इंदापूर तालुक्यात सध्या होऊ घातलेल्या आघाडीच्या राजकारणामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्ता सक्रिय झाला असून पाटील – माने – गारटकर एकत्र आल्याने उमेदवारीसाठी दावेदारी करू लागला आहे. इंदापुरात कार्यकर्ता अस्वस्थ इंदापूर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी, भाजप व इतर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ता मात्र ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अस्वस्थ दिसून येत आहे. युती आघाडीच्या राजकारणात आपला बळी जाणार नाही ना? गेली आठ वर्षे केलेली तयारी वाया तर जाणार नाही ना? ऐनवेळी बाहेरून उमेदवार आयात केला जाणार नाही ना? असे अनेक प्रश्न सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याला पडत आहे. भरणे यांचे टेन्शन वाढणार? इंदापूरचे आमदार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापुढे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे एकत्र आल्याने मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यातच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नगरपरिषद निवडणुकीतून राष्ट्रवादीशी फारकत घेतल्याने ग्रामीण भागात मंत्री भरणे यांचे टेन्शन वाढणार आहे.