Indapur News – खडकवासला पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी सध्या आक्रमक झाले आहेत. १२ मे रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन देऊनही आज १४ तारीख उलटली तरी कालव्याला पाणी न आल्याने पिके जळून खाक होत आहेत. विभागाच्या या मनमानी कारभारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. पाण्याची नितांत गरज असताना आवर्तन लांबल्याने ऊस, भाजीपाला व हंगामी पिके वाळून जात आहेत. शेतीसोबतच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हवालदिल झालेले शेतकरी “आता बँकांचे कर्ज कसे फेडायचे?” या विवंचनेत सापडले आहेत. “इंदापूरसाठी पाणी सोडले आहे” असे सांगून अधिकारी वेळ मारून नेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर पाणी पोहोचले नसताना कागदोपत्री दाव्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे आणि तालुक्यातील पाझर तलाव व बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा शेतकरी आणि लाभधारकांनी प्रशासनाला इशारा देताना आपल्या मागण्या मांडल्या आहेत. इंदापूर तालुक्याला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करावा. अघोषित भारनियमन रद्द करून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. कलम १४४ सारखी जाचक कलमे रद्द करावीत. पंप आणि पाईपची तोडफोड थांबवावी, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. “सध्या १४० किलोमीटरपर्यंत पाणी पुढे सरकले आहे. इंदापूर तालुक्यात पाणी पोहोचण्यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागतील.” – किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग.