इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष स्वबळावर आणि तुतारी चिन्हावरच लढवणार असल्याची स्पष्ट व ठाम भूमिका तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी जाहीर केली आहे.कोणत्याही परिस्थितीत युती किंवा आघाडी न करता,पक्षाची ताकद जनतेसमोर मांडत ही निवडणूक लढवली जाईल,असेही त्यांनी ठणकावून सांगितले. महारुद्र पाटील म्हणाले की, “इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व आठ मतदारसंघांमध्ये तसेच पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आहेत.कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करून राजकीय आखाड्यात मोठी खळबळ उडवली आहे. पक्ष संघटना,कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेशी असलेले नाते याच्या जोरावर ही निवडणूक ताकदीने लढवून पक्षाचे पॅनल विजयी होईल,असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाची संघटना मजबूत असून ग्रामपातळीपासून तालुकास्तरापर्यंत कार्यकर्ते सक्रिय आहेत.शेतकरी,कामगार,युवक व महिला वर्गामध्ये पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण असून आगामी निवडणुकीत त्याचा फायदा होईल, असा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची लढत नसून तालुक्याच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणारी ठरणार आहे.अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने तुतारी चिन्हावर स्वबळाचा नारा देत मैदानात उतरायचा निर्णय घेतल्याने, इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.