शिक्षकांनी दिलेल्या गुरुमंत्रामुळे विद्यार्थी ते शिक्षण संस्थेचा संस्थापक होण्याचा मान मिळाला : बाळासाहेब हरणावळ

इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या २००१ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा इंदापूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी गुरुकुल विद्या मंदिर, गोखळी या शिक्षण संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. “रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी दिलेल्या गुरुमंत्रामुळे शिक्षणाचे महत्त्व समजले आणि विद्यार्थी ते शिक्षण संस्थेचा संस्थापक होण्याचा मान मिळाला,” अशी कृतज्ञता हरणावळ यांनी व्यक्त केली.
शिक्षकांचा सन्मान, कर्मवीर भाऊराव पाटलांचे पूजन –
कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक पोपट जाधव, सयाजी काटकर, जगन्नाथ बनसोडे, अंकुश मोहिते, शिवाजी कुंभार, पराग शिवदास, अजमुद्दिन मुलाणी, गुलणार मुलाणी, छाया जाधव, चोरमले मॅडम, छाया देवकर आणि शाळेचे मुख्याध्यापक शिंगाडे सर उपस्थित होते. शिक्षकांना सन्मानचिन्ह, आठवण म्हणून एक झाड, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी सांगितल्या आठवणी –
स्नेह मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वत:ची ओळख करून देत आपण कार्यरत असलेल्या क्षेत्राची माहिती दिली. हरणावळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “ज्या संस्थेत आपण शिकलो, ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले, त्यांच्याबद्दल आदर ठेवून विद्यार्थ्यांनी कार्यरत राहावे. रयत शिक्षण संस्थेला आम्ही कधीही विसरणार नाही.” त्यांच्या या शब्दांना उपस्थितांनी दाद दिली.
स्नेह मेळाव्याचे आयोजन राहुल देवकर, समाधान मखरे आणि संतोष देवकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब हरणावळ, कृषी अधिकारी महेश वाघ, गणेश चव्हाण, अंकुश तरंगे, सारिका पवार, मनीषा मोरे, स्वाती सोनवणे, चंदा प्रधान, अलमास मणियार, अनिस शेख, लक्ष्मी दळवी, स्वाती तडसरे आणि तमन्ना शेख यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल पळसे आणि प्रवीण शिंदे यांनी केले, तर प्रीतम सूर्यवंशी यांनी आभार मानले.
रयत शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली असून, या स्नेह मेळाव्याने माजी विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली. हरणावळ यांच्या यशाने संस्थेच्या कार्याला पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.





