Indapur News : दोरखंडाने रथ ओढला अन् तोफा धडाडल्या! इंदापूरच्या ग्रामदैवताचा ऐतिहासिक ‘शाही उत्सव’ पाहिलात का?
Indapur News : पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि आकर्षक रोषणाईत इंद्रेश्वर महादेवाची भव्य रथयात्रा; इंदापूरकरांनी जपली संस्कृती.

Indapur News – इंदापूर शहराचे ग्रामदैवत असलेल्या इंद्रेश्वर महादेवाच्या यात्रेनिमित्त शनिवारी (दि. १४) रात्री पारंपारिक भक्तिभाव, धार्मिक उत्साह आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारी रथाची भव्य ‘शाही मिरवणूक’ मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि नारीशक्तीच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली होती.
यात्रेनिमित्त सकाळी मंदिरात रुद्राभिषेक पार पडला. त्यानंतर रात्री उशिरा रथाचे पूजन करण्यात आले. फुलांच्या माळा आणि पारंपरिक अलंकारांनी सजविलेला रथ भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र होता. भाविकांनी दोरखंडाच्या साहाय्याने हा रथ ओढत आपली श्रद्धा व्यक्त केली. मिरवणुकीतील महाकाय नंदीची प्रतिकृती, फटाक्यांची आतषबाजी आणि तोफांची सलामी यामुळे उत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला होता. मार्गावर काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या आणि चौकाचौकात नागरिकांनी केलेले रथाचे औक्षण यामुळे मिरवणुकीला विशेष शोभा आली होती.
महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी रांगा
यात्रेच्या शाही सोहळ्यानंतर रविवारी (दि. १५) महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच इंद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला. ‘हर हर महादेव’ आणि ‘ओम नमः शिवाय’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले. या उत्सवाच्या निमित्ताने इंदापूरकरांनी जपलेला सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
नारीशक्तीचा ठसा आणि पारंपरिक वाद्ये
या मिरवणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डीजेच्या गोंगाटाला पूर्णपणे फाटा देत जपलेली पारंपरिक संस्कृती. ‘आदिशक्ती महिला झांज पथक’ आणि ‘हिरकणी टाळ पथका’च्या शेकडो महिलांनी वाद्यांच्या निनादात सहभाग घेत भक्तीचा जागर घडविला. बालगोपाळांनी धारण केलेली भगवान शंकर आणि माता पार्वतीची वेशभूषा तसेच त्यांनी सादर केलेले ‘महाकाल तांडव’ उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.





