प्रभात वृत्तसेवा पळसदेव – पळसदेव परिसरासह संपूर्ण इंदापूर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकर्यांवर तोडणी आणि वाहतूक खर्चाचे प्रचंड ओझे वाढले असून, ऊस वेळेत गाळपाला जावा यासाठी आता प्रति टन 50 रुपये दराने तोडणी कामगारांना पैसे देण्याची वेळ आली आहे. यासोबतच ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर किंवा ट्रक चालकांना भत्ता म्हणून दररोज हजारो रुपये द्यावे लागत असल्याने शेतकर्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. शेतकर्यांनी पोरापूरागत जपलेल्या उसाला गाळपासाठी पाठवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पैसे देणार्या शेतकर्यांचा खोडवा ऊस प्रथम गाळपाला घेतला जातो, तर अद्याप लागण असलेला, परिपक्व ऊस शेतातच उभा राहतो, असे चित्र मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे शेतकर्यांत नाराजी वाढत आहे. उजनी पट्ट्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकर्यांना लवकर ऊस घालवून नवीन पिके घ्यायची घाई असते. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी या प्रक्रियेत अग्रेसर असतात. मात्र याच शेतकर्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदार मालक यांचे मनमानी व्यवहार वाढत आहेत. तोडणीसाठी प्रति टन 50 रुपये घेण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू असून, शेतकर्यांवर अतिरिक्त खर्चाचा मोठा भुर्दंड बसत आहे. शेतकर्यांची आर्थिक कुबळी वाढत असूनही या पिळवणुकीविरुद्ध यंत्रणेतून किंवा कारखाना प्रशासनातून कोणीही आवाज उठवायला पुढे येत नसल्याची भावना शेतकर्यांत वाढू लागली आहे. शेतकर्याला आता कोणीही वाली उरलेले नाही, अशी खंत ऊस उत्पादक शेतकरी खुलेपणाने व्यक्त करत आहेत.