Indapur News : महामार्ग पोलीस केंद्र इंदापूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी सोमनाथ पडसळकर रुजू

इंदापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथील महामार्ग पोलीस केंद्र पूर्णपणे सज्ज झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांनी प्रभारी अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग सुरक्षा पथक अलर्ट मोडवर आहे. पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणांना पथकाने भेटी दिल्या आहेत. नागरिकांना वाहतूक किंवा इतर कोणत्याही अडचणींसाठी महामार्ग सुरक्षा शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
24 तास गस्त, स्थानिकांशी संवाद
पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांनी सांगितले की, पंढरपूर वारीदरम्यान वारकरी, दिंड्या आणि पालखी सोहळे मोठ्या संख्येने महामार्गावरून प्रवास करतात. या काळात वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महामार्ग सुरक्षा पथक 24 तास गस्त घालणार आहे.
बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते अकलूज या हद्दीतील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील प्रत्येक विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पथकाने भेटी देऊन स्थानिक नागरिक आणि गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने नागरिकांनी वारकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहात जनजागृती; पथकरातून सूट
इंदापूर तालुक्यात सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गावोगावच्या शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये तसेच चालक आणि वाहकांसाठी रस्ते वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
दरम्यान, यंदाच्या वारीदरम्यान पालखी सोहळ्यातील वाहनांना आणि मानाच्या पालख्यांना पथकरातून (टोल) शासनाने सूट दिली आहे. याबाबतचे शासन परिपत्रक जाहीर झाले असून, यामुळे यंदाची वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुलभ आणि लाभदायक ठरणार आहे. महामार्ग सुरक्षा पथकाच्या या विशेष तयारीमुळे वारी सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





