प्रभात वृत्तसेवा इंदापूर – श्री संत गजानन महाराज शेगाव परिवार, इंदापूर यांच्या वतीने आयोजित श्री गजानन विजय ग्रंथ एकदिवसीय पारायण सोहळा इंदापूर शहरातील वाघ पॅलेस येथे मोठ्या भक्तिभावात पार पडला. जय गजानन, जय गजाननच्या घोषात आणि हरिनामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.या सोहळ्याचे आयोजन शशिकांतदादा पोकळे व प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी श्री महाराजांची काकड आरती, पूजा, जपमाळ पूजन, अकराव्या अध्यायाचे वाचन, आरती व महाप्रसाद अशा कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय बनले. महिला व पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला. या वेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होत भक्तांसोबत हरिनामात तल्लीन झाले. वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक फुगड्या, दिंडी व खेळांमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. कृषिमंत्री भरणे आणि गारटकर यांनी स्वतः फुगडी खेळून भक्तांसोबत एकरूप होत आनंद व्यक्त केला.पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी शिरीष जोशी व गजानन भक्त परिवार, इंदापूर यांनी विशेष परिश्रम घेतले. शहरातील शेकडो नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले आणि गजानन जय जयकारच्या घोषात इंदापूर भक्तिरसात न्हाऊन निघाले.