प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर तालुक्यातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल (बीपीएल) आणि ईडब्ल्यूएस कुटुंबांसाठी महावितरणची 1 किलोवॅट सौरयोजना म्हणजे अक्षरशः अभूतपूर्व दिलासा ठरणार आहे. 25 वर्षे मोफत वीज आणि अतिरिक्त निर्मित विक्रीतून थेट उत्पन्न मिळवून देणारी ही योजना तालुक्यातील हजारो घरांना ऊर्जा स्वावलंबन मिळवून देणार आहे. राज्याचे कृषिमंत्री व इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकारामुळे ही योजना इंदापूरात गावोगावी झपाट्याने राबवली जाईल, असा जनतेत ठाम विश्वास व्यक्त होत आहे. इंदापूर तालुक्यात हजारो बीपीएल कुटुंबांना थेट लाभ मिळणार असून, महावितरणच्या माहितीनुसार राज्यातील 5 लाख बीपीएल व ईडब्ल्यूएस घरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. इंदापूर तालुक्यात बीपीएल कुटुंबांची मोठी संख्या असल्याने योजनेचा प्रभावी फायदा मिळेल, अशी खात्री प्रशासन व जनतेत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महिन्याला 100 युनिटपेक्षा कमी वापर करणार्या सर्व कुटुंबांना योजना तात्काळ लागू होणार आहे. 25 वर्षे मोफत वीज घरगुती खर्चातील मोठी बचत व घराच्या छतावर बसवण्यात येणार्या 1 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून दरमहा सरासरी 120 युनिट वीज निर्मिती. त्यापैकी 100 युनिट मोफत वीज उर्वरित 20 युनिट महावितरणला विकून थेट उत्पन्न ही रचना गरीब कुटुंबांसाठी केवळ दिलासा नव्हे तर आर्थिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय ठरणार आहे. महावितरणच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले की, या सोलर युनिट्सचे आयुष्य तब्बल 25 वर्षांचे असून इतक्या दीर्घकाळ मोफत वीज मिळणे ही मोठी क्रांती ठरणार आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबावर अनुदानाचा पाऊस बरसणार आहे. जवळपास ‘शून्य खर्चात’ प्रकल्प या योजनेसाठी केंद्र सरकारचे अनुदान 30,000 रुपये, राज्य सरकारचे 17,500 रुपये, असे एकूण अनुदान 47,500 रुपये मिळणार आहे. या साहाय्यामुळे बीपीएल व ईडब्ल्यूएस कुटुंबांना हा संपूर्ण प्रकल्प जवळजवळ शून्य खर्चात उभारणे शक्य होणार आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील दुर्बल घटकांसाठी ही योजना अत्यंत परवडणारी व लाभदायक ठरणार आहे. कृषिमंत्र्यांचा पुढाकार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूरातील विकासकामांवरील वेग आणि पुढाकार सर्वपरिचित आहेत. सायकल ट्रॅक, रस्ते, पाणीपुरवठा, शेती प्रकल्पांप्रमाणेच सौरऊर्जेच्या या योजनेलाही मंत्र्यांच्या पाठबळामुळे गती मिळणार, असा सर्वसाधारण विश्वास स्थानिक नागरीकांमध्ये वाढत आहे. गावोगावी अधिकार्यांसोबत बैठका, माहिती मोहीम आणि पात्रतेची छाननी सुरू झाल्याची प्राथमिक हालचाल अनेकांनी अनुभवली आहे. निवडणुका संपताच योजना सुरू होणार इंदापूर नगरपरिषदेसह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांत पूर्ण होत आहेत. त्यानंतर प्रशासनाकडून सौर योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली की गावनिहाय निवड, छत मोजणी, तांत्रिक पाहणी आणि सौर पॅनल बसवण्याचे काम जलदगतीने सुरू होईल, अशी शक्यता प्रशासनातही व्यक्त केली जात आहे.