इंदापूर : इंदापूर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दिलासा देण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेवेचा प्रारंभ रविवारी (ता. २८ सप्टेंबर २०२५) राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. यावेळी रुग्णांशी संवाद साधताना त्यांनी तालुक्यातील गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डायलिसिससाठी लागणारी सर्व औषधे आणि तपासण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषिमंत्री भरणे म्हणाले, “या सेवेमुळे रुग्णांना बाहेरील तालुक्यांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.” त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णसेवेत कोणताही हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, कामचुकारपणाची गंभीर दखल घेत कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी वैद्यकीय अधिकारी सिद्धार्थ नामपल्ली, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, प्राध्यापक अशोक मखरे, बाळासाहेब ढवळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कुत्रा चावल्यावर उपचारही मोफत कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले, “कुत्रा चावल्यास घाबरण्याची गरज नाही. उपजिल्हा रुग्णालयात यापुढे कुत्रा चावल्यावर इंजेक्शन्स आणि उपचार मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील.” त्यांनी नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.