प्रभात वृत्तसेवा इंदापूर – चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेच्या दरात झालेली घसरण आणि गेल्या तीन वर्षांपासून इथेनॉलच्या किमतीत झालेली स्थिरता यामुळे देशातील साखर कारखानदारी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. साखरेचे दर क्विंटलमागे ३०० रुपयांनी घटल्याने कारखान्यांना शेतकऱ्यांची देयके वेळेवर देणे कठीण होत असून, यावर उपाय म्हणून साखरेचा किमान विक्री दर (MSP) ४१ रुपये करावा, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, उसाचा एफआरपी खर्च वाढलेला असताना साखरेची विक्री किंमत मात्र कमी आहे. सध्या साखरेचा सरासरी दर ३६०० रुपये प्रति क्विंटल असून उसाचा उत्पादन खर्च ४ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. ही तफावत दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांना निवेदने देण्यात आली आहेत. साखरेचा किमान विक्री दर ३१ रुपयांवरून ४१ रुपये करणे व्यवहार्य आहे, कारण यापूर्वी ग्राहकांनी वाढीव दर स्वीकारले आहेत. तसेच इथेनॉलच्या विक्री किमतीतही तातडीने वाढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.केंद्र सरकारच्या भेटीसाठी लवकरच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील साखर प्रतिनिधींचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. याशिवाय, अतिरिक्त साखरेचा साठा विचारात घेता ५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणीही महासंघाने केली आहे. कारखान्यांवरील व्याजाचे ओझे कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४ दिवसांच्या आत बिले देण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली आहे.