प्रभात वृत्तसेवा इंदापूर – रुई (पिंपळाचा मळा) येथील मारकड, पारेकर आणि चोरमले कुटुंबीयांनी गट क्रमांक ४१६ मधील आपल्या कायदेशीर हिश्याप्रमाणे जमीन मिळावी, तसेच अतिक्रमण तात्काळ हटवावे, या ठाम मागणीसाठी सोमवार (दि. १७) पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरू केले आहे. महसूल विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत असल्याने संतप्त शेतकरी शेवटचा उपाय म्हणून उपोषणाच्या मार्ग अवलंबला आहे. गट क्रमांक ४१६ मधील ७ हेक्टर १५ आर क्षेत्रावर चार सहखातेदारांचा कायदेशीर मालकी हक्क आहे, त्यानुसार प्रत्येक कुटुंबास १/४ हिशा मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही अतिक्रमणधारकांनी आपल्या हिश्यापेक्षा अधिक क्षेत्र बळकावत कुंपण उभारले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादात प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. यापूर्वी २७ मार्च २०२३ रोजी उपोषण छेडण्यात आले होते. तेव्हा ‘हिस्सेवाटप करून देऊ’ असे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित केले होते. पण त्यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही. अतिक्रमणधारकांचे वर्तन आडदांड व आक्रमक असल्याचा आरोप करत, उपोषणकर्त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आमच्या जीवितास धोका झाल्यास त्यास अतिक्रमणधारकच जबाबदार राहतील, असे त्यांनी सांगितले आहे. तहसील कार्यालयासमोर शांतपणे सुरू असलेल्या या उपोषणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या -गट क्रमांक ४१६ मधील १/४ हिस्स्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे. -वहिवाटीप्रमाणे प्रत्यक्ष स्थळी दिशा दाखवून हिस्सा निश्चित करावा. -अतिक्रमण करणाऱ्यांवर महसूल व पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी. -आंदोलनकर्त्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी.