रेडा -बारामती प्रांताधिकाऱ्यांनी काही अटींवर परवानगी दिल्यानंतर मंगळवारी (दि. 12) सकाळपासून इंदापूर शहरातील बाजारपेठ सुरु झाली.
लॉकडाऊनमुळे तब्बल 52 दिवसांपासून शहरातील मुख्य बाजारपेठ बंद होती. त्यामुळे संपूर्ण अर्थकारण ठप्प झाले होते. इंदापूर शहरात एक ही रुग्ण सापडला नाही. तरी देखील इंदापूरमधील लॉकडाऊन काढण्यात आले नव्हते.
त्यामुळे व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, संघाचे संस्थापक मुकुंद शहा, भरत शहा, नरेंद्र गांधी सराफ, सराफ संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास बानकर, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, बंडू बोत्रे आदींनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांची भेट घेवून व्यापारी वर्गाची बाजू त्यांच्यासमोर मांडली होती.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यापर्यंत इंदापूरकरांच्या भावना पोहोचवल्या होत्या. याची दखल घेऊन बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सोमवारी काही अटींवर रोटेशन पद्धतीने बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिली.
या पद्धतीने राहणार रोटेशन
सोमवार, गुरुवारसर्व्हिसिंग, संगणक, इलेक्ट्रॉनिक, रेडिमेड, फर्निचर, मोबाइल, फोटो स्टुडिओ, स्वीट होम, फुले व पुष्पहार दुकाने.
मंगळवार, शुक्रवारकापड दुकाने, भांडी, शिलाई, फूटवेअर, सोन्याचांदीचे दुकाने, घड्याळे, बॅगा, पत्रावळी
बुधवार, शनिवारस्टेशनरी, कटलरी, स्टील, टायर्स, सायकल, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरीयल, पेंट, झेरॉक्स, डिजिटल फ्लेक्स, प्रिंटिंग प्रेस, माती व भांड्यांची दुकाने, टोपल्या व बांबूची दुकाने किराणा माल, भाजीपाला, फळे, दूध, शेतीविषयक बी, बियाणे व औषधे ही दुकाने दररोज सुरू राहतील.
सर्वांनी सहकार्य करत शासकीय सूचनांचे पालन केल्याने इंदापूर शहरात करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.हा इंदापूरचा आदर्श पॅटर्न तयार झाला आहे. यापुढे ही असेच सहकार्य करुन शहर करोना मुक्त ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
-अंकिता शहा, नगराध्यक्षा