प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर शहर 2014 पूर्वी कसे होते आणि मी आमदार झाल्यानंतर ते किती बदलले, हे येथील जनतेलाच ठाऊक आहे. विकास केला असेल तरच आम्हाला मतदान करा, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरकरांंना साथ देण्याचे आवाहन केले.इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा व सर्व 20 नगरसेवकांच्या प्रचारार्थ श्रीराम चौक-अकलूज नाका परिसरात भरलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कृषिमंत्री भरणे म्हणाले, इंदापूरच्या विकासासाठी जेवढा निधी आणता येईल, तेवढा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणला आहे. भरत शहा नगराध्यक्ष झाले आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विजय मिळाला, तर इंदापूर शहराला योजनांचा पाऊस पाडू. करोना काळात नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केलेल्या कार्याची दाद देताना ते म्हणाले, लोकांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांनी आणि आम्ही प्रामाणिकपणे सांभाळली. बारामतीप्रमाणे शहरातील केबल अंडरग्राउंड करण्याचा संकल्पही आता प्रत्यक्षात आणू. कुगाव-कळाशी पुलाला गती व्यंकटेश नगरच्या प्रलंबित प्रश्नावर मी स्वतः देवस्थान ट्रस्ट व नागरिकांशी चर्चा करून तो मार्गी लावणार आहे, असा ठोस शब्द भरणे यांनी दिला. व्यापारी संघाच्या मागणीवरुन कुगाव-कळाशी पुलाला मंजुरी मिळाली. अजितदादांकडे व्यापार्यांनी पत्र दिले आणि तो निर्णय एका रात्रीत अंमलात आला. या पुलामुळे इंदापूर बाजारपेठेला नवे दालन उघडणार आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी पेलणारच. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे आणि संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरचा विकासात्मक कायापालट करू. कुगाव-कळाशी पुलाबाबत व्यापारी संघाचे साधे पत्र आम्ही दिले. अजितदादा व भरणेमामा यांनी तो शब्द एका रात्रीत पूर्ण केला. माझ्या कामाची साक्ष इंदापूरची जनता देईल.” – भरत शहा, नगराध्यक्षपदाचे उमेदवार