विशाखापट्टणम : शेफाली वर्माचे नाबाद अर्धशतक व जेमीमा रॉड्रीग्जची अफलातून खेळी यांच्या जोरावर भारताच्या महिला संघाने श्रीलंका महिला संघाचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर भारतीय संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेफाली वर्मा व स्मृती मानधनाने थाटात सुरुवात केली. या जोडीने चौथ्याच षटकांत २९ धावांची सलामी दिली. स्मृती आक्रमक खेळ करत असतानाच १४ धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमीमाने शेफालीला सुरेख साथ देत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दडपण आणले. या जोडीने चौफेर फटकेबाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. जेमीमा पुन्हा एकदा मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच २६ धावांवर बाद झाली. तीने या खेळीत १५ चेंडूत ४ चौकार व १ षटकार फटकावला. एका बाजूने शेफाली आक्रमक फटकेबाजी करत होती. त्यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौरने शेफालीला साथ देत विजय दृष्टीपथात आणला. शेफालीने आपले अर्धशतकही चौकार खेचत थाटात पूर्ण केले. त्यानंतर तीने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. विजयासाठी एक धाव हवी असताना हरमन १० धावांवर बाद झाली. तीच्या जागी आलेल्या रिचा घोषने विजयी धाव घेतली व संघाचा विजय अवघ्या १२ व्या षटकातच साकार केला. शेफालीने नाबाद ६९ धावांची खेळी करताना केवळ ३४ चेंडूत ११ चौकार व १ षटकार खेचला. श्रीलंकेकडून कविशा दीलहारी, मल्की मदारा व काव्या काविंदी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तत्पूर्वी, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला पहिल्यांदा फलंदाजी दिली. श्रीलंकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. संघाच्या अवघ्या २ धावा झालेल्या असताना विश्मी गुणरत्ने बाद झाली. त्यानंतर चामीरी अटापट्टूने हसीनी परेरासह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. चामीरीने आक्रमक फटकेबाजी केली मात्र, याच प्रयत्नात ती ३१ धावांवर बाद झाली. या खेळीत तीने २४ चेंडूत ३ चौकार व २ षटकार फटकावले. पाठोपाठ हसीनीही परतली. तीने २२ धावांची खेळी करताना २८ चेंडूत ३ चौकार मारले. यावेळी हर्षिथा समरविक्रमाने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेतली व डाव सावरला. तीने संघाचे शतकही फलकावर लावले. मात्र, त्यानंतर ती लगेचच ३३ धावांवर बाद झाली. या खेळीत तीने ३२ चेंडूत ४ चौकार फटकावले. पाठोपाठ निलाक्षी डीसील्व्हानेही निराशा केली. कविशा दीलहारीने १४ तर कौशनी न्युथागनाने ११ धावांची खेळी केली. या दोघी बाद झाल्यावर श्रीलंकेच्या फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेल्या. त्यांचा डाव २० षटकांत ९ बाद १२८ असा रोखला गेला. भारतीय संघाकडून श्री चरीणी व वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला मर्यादीत २० षटकांत १२१ धावाच करता आल्या होत्या. हा सामना भारतीय संघाने ८ गडी राखून जिंकला होता. आजच्या सामन्यात त्यांनी केवळ सात धावांची भर घातली. भारतीय संघाने पहिल्या षटकापासून अचुक गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. चामरी अटापट्टू व हर्षिथा समरविक्रमाचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला हात मोकळे सोडून फलंदाजी करता आली नाही. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला. आयसीसी रँकिंगमधील अव्वल अष्टपैलु दीप्ती शर्मा हीला विश्रांती देण्यात आली होती. दीप्तीला बरे वाटत नसल्याने तिला विश्रांती देण्यात आली. दीप्तीच्या जागी स्नेह राणा हीचा संघात समावेश करण्यात आला होता. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नव्हता.