IND vs SA 3rd ODI : तिसऱ्या सामन्यासह भारताचा 2-1 ने ऐतिहासिक मालिका विजय…

IND vs SA 3rd ODI Match Result : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (21 डिसेंबर) पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफिक्रेवर 78 धावांनी विजय मिळवला. पार्ल येथील बोलँड पार्क येथे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत आठ विकेट गमावत 296 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.5 षटकांत सर्वबाद 218 धावांवर आटोपला. यासह भारतानं मालिकाही 2-1 अशी जिंकली.
भारतीय संघाने दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमान संघाचा 78 धावांनी पराभव केला. पहिला सामना भारतानं जिंकला होता तर दुसरा सामना जिंकण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आले होते. दक्षिण आफ्रिकेत पाच वर्षांनंतर मालिका जिंकण्यात भारताला यश आले आहे. गेल्या वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2018 मध्ये मालिका जिंकली होती.
विजयासाठी 297 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेकडून फलंदाजीत टोनी डी जॉर्जीने सर्वाधिक 81 धावा केल्या. त्याने शेवटच्या सामन्यात शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. यावेळी मात्र त्याला अपयश आले. कर्णधार एडन मार्करामने 36 धावा केल्या. हेन्रिक क्लासेनने 21, रीझा हेंड्रिक्सने 19, ब्युरेन हेंड्रिक्सने 18 आणि केशव महाराजने 10 धावा केल्या. रॅसी व्हॅन डर डुसेन आणि लिझाद विल्यमसन यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. विआन मुल्डरने एक धाव करून बाद झाला तर नांद्रे बर्गर एक धाव घेत नाबाद राहिला.
भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने चार विकेट घेतल्या. या मालिकेत त्याने एकूण नऊ विकेट घेतल्या. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टाॅस हारल्यानंतर टीम इंडियाला प्रथम फलंदाजीला यावे लागले. भारताने 50 षटकांत आठ विकेट गमावत 296 धावा केल्या.
भारताकडून संजू सॅमसनने 114 चेंडूत 108 धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचे हे पहिले शतक आहे. याशिवाय टिळक वर्माने 77 चेंडूत 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावले. 101 धावांवर तीन विकेट पडल्यानंतर सॅमसन आणि टिळक यांनी 116 धावांची भागीदारी केली. शेवटी रिंकू सिंगने 27 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या.
याशिवाय पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या रजत पाटीदारने 16 चेंडूत 22 धावा केल्या तर कर्णधार केएल राहुलने 35 चेंडूत 21 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 14 धावा करून बाद झाला तर साई सुदर्शन 10 धावा करून बाद झाला. अक्षर पटेलला एकच धाव करता आली. अर्शदीप सिंग सात धावा करून तर आवेश खान एक धावेवर नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत ब्युरेन हेंड्रिक्सने सर्वाधिक तीन बळी घेतले. नांद्रे बर्जरला दोन यश मिळाले. लिझाद विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले.





