IND vs PAK U19 World Cup 2026 : आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सुपर सिक्स फेरीतील शेवटचे सामने सुरू असून सेमीफायनलचे चित्र स्पष्ट होत आहे. अशातच १ फेब्रुवारी रोजी होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ग्रुप-२ मधील सर्वात मोठा आणि निर्णायक सामना ठरणार आहे. या सामन्याच्या निकालावरच सेमीफायनलचे भवितव्य अवलंबून आहे. ग्रुप-२ मधील गणिते: भारत आघाडीवर – सुपर सिक्सच्या ग्रुप-२ मध्ये भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून भारताच्या खात्यात ६ गुण आहेत. त्याचबरोबर इंग्लंड संघाचे ६ गुण आहेत, मात्र सरस नेट रनरेटमुळे भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या ग्रुपमधून बांगलादेश, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांचे सेमीफायनलचे स्वप्न भंगले आहे. पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ पाकिस्तानचा संघ सध्या ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला हरवणे अनिवार्य आहे. केवळ विजयच नाही, तर त्यांना नेट रनरेट सुधारण्यासाठी मोठ्या फरकाने जिंकावे लागेल. तसेच पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, भारताने हा सामना जिंकल्यास सेमीफायनलचे तिकीट निश्चित होईल. तसेच पराभव झाला तरी रनरेटच्या जोरावर भारताच्या आशा जिवंत राहू शकतात. भारत-पाक सामन्यात विहान मल्होत्रावर लक्ष इतर गटातील स्थिती – ग्रुप-१ मधून ऑस्ट्रेलियाने आधीच आपले सेमीफायनलमधील स्थान निश्चित केले आहे. या गटातील उर्वरित एका जागेसाठी अफगाणिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हेही वाचा – IND W vs AUS W : महिला क्रिकेटचा थरार १५ फेब्रुवारीपासून! ऑस्ट्रेलियाचा तगडा संघ जाहीर; सोफी मोलिन्युक्सकडे टी-२० चे नेतृत्व भारत-पाक हाय-व्होल्टेज ड्रामा १ फेब्रुवारीला – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना केवळ खेळ नसून दोन्ही देशांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. पाकिस्तान भारताला रोखून आपली उमेद जिवंत ठेवणार की टीम इंडिया विजयाची मालिका कायम राखत सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश करणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.