IND vs PAK : पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता Blind T20 World Cup 2024 मध्येही सहभागी होण्यास टीम इंडियाचा नकार…

Blind T20 World Cup 2024 : चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणेच अंध क्रिकेट T20 विश्वचषक 2024 देखील पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. भारताने पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. टीम इंडिया ब्लाइंड टी-20 वर्ल्ड कप 2024 साठीसुध्दा पाकिस्तानला जाणार नाही. एका वृत्तानुसार, भारत सरकारने संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. यानंतर टीम इंडियाने आपले नाव मागे घेतले आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
इंडिया टुडे मधील एका बातमीनुसार, भारताने अंध T20 विश्वचषक 2024 मधून आपले नाव मागे घेतले आहे. भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली नाही. 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान अंध टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे, मात्र आता सरकारच्या निर्णयानंतर भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही. भारतीय संघ अंध T20 विश्वचषकाचा चॅम्पियन देखील राहिलेला आहे. भारत विश्वचषकात सहभाग घेणार नसल्याने पाकिस्तानला आता आणखी एक मोठा फटका बसला आहे.
अंध टी-20 विश्वचषकात भारताचे रेकाॅर्ड आहे दमदार..
ब्लाइंड टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2022 च्या फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता. भारताने हा सामना 120 धावांनी जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 277 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 157 धावा करू शकला होता. टीम इंडियाने 2012 आणि 2017 मध्येही चमकदार कामगिरी केली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्द्यावरून निर्माण झाला वाद….
भारताचा मुख्य संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाहीये. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. या मुद्द्यावरून बराच वाद झाला आहे आणि सध्या देखील यावर चर्चा सुरू आहे. पाकिस्तानने अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी ट्रॉफी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आक्षेपानंतर तो रद्द करावा लागला.





