IND vs NZ 3rd Test : – भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धची मालिका २-० अशी गमावली असून अजूनही भारताचे आघाडीचे फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अलगद अडकत आहेत. त्यामुळे भारताला घराच्या मैदानावर अशा परिस्थितीचा सामना कधीच करावा लागला नाही. शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम लढतीमध्ये किमान विजय मिळविताना न्यूझीलंडकडून क्लीन स्वीप टाळणे, हेच भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे. न्यूझीलंड विरुद्धची मालिका ही विश्वकसोटीच्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी महत्वाची होती. पहिल्या दोन लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने भारतासमोर विश्वकसोटीच्या अंतिम लढतीमध्ये पोहचण्याचे आव्हान थोडे कठीण झाले आहे. अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीमध्ये टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंड विरुध्दच्या तिसऱ्या लढतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयाची आवश्यकता आहे. ही लढत बरोबरीत राहिल्यास किंवा भारत पराभूत झाल्यास हे आव्हान अजून अवघड होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यापूर्वी अजून ६ सामने खेळायचे असून अंतिम फेरी गाठण्यासाठी किमान चार विजयाची आवश्यकता आहे. न्यूझीलंड विरुद्धची एक व बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पाच अशा एकूण सहा लढती शिल्लक आहेत. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघ फिरकीच्या जाळ्यात अडकला होता. त्यामुळे दोन दिवसांच्या सरावाच्या वेळी भारतीय फलंदाजांनी फिरकीचा कसून सराव केला. बंगळुरू कसोटीच्या पहिला डाव गडगडल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने चांगले पुनरागमन केले होती. असे असले तरी पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजीसमोर व दुसऱ्या सामन्यात फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजानी नांगी टाकली. न्यूझीलंडच्या दोन लढतीच्या चार डावांमध्ये भारताने तीन डावात ४६, १५६ व २४५ धावा केल्या आहेत. त्यामुळे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करत आहेत, हे दिसून आले. फलंदाज सध्या अडचणीत असून त्यांना लवकरच यातून बाहेर यावे लागणार आहे. मायदेशात न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा सामना झाल्यानंतर, भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान असणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सूर मिळविण्यासाठी मुंबई कसोटी हा एकमेव उपाय आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या बरोबरीने यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल या युवा फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे. IND vs NZ 2nd Test : जे घडलं, ते अपेक्षित नव्हतं : कर्णधार शर्मा न्यूझीलंडने आतापर्यंत चांगली तयारी करताना आपली रणनीती योग्य प्रकाराने राबविली आहे. त्यामुळेच न्यूझीलंडला भारतीय फलंदाज व गोलंदाजांच्या समोर कडवे आव्हान उभे करण्यात यश मिळाले आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांची कामगिरी चिंतेचा विषय झाली आहे. भारताला न्यूझीलंडला रोखायचे असेल तर या चार खेळाडूंना चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय फलंदाजीसमोर फिरकीचे आव्हान असणार आहे. त्यामुळे त्यांना पूर्वीसारखाच सूर पकडावा लागणार असून, नावाप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. ICC Test Rankings : आफ्रिकेच्या रबाडाची क्रमवारीत मोठी झेप, बुमराहला बसला मोठा फटका… भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, वॉशिंग्टन सुंदर. न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, मार्क चॅपमन, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), एजाज पटेल, मॅट हेन्री, टिम साउदी , विल्यम ओ’रुरके, जेकब डफी.