IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीत यशस्वी जैस्वालने केला मोठा विक्रम, एबी डिव्हिलियर्सच्या यादीत मिळवलं स्थान….

IND vs NZ 2nd Test (Yashasvi Jaiswal) : न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केल्यानंतर यशस्वी जैस्वालने आपली विकेट गमावली. 30 धावांची इनिंग खेळल्यानंतर यशस्वी ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. मात्र, या 30 धावांच्या खेळीत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या विक्रमासह यशस्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सच्या यादीतही सामील झाला आहे.
यशस्वीने 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या वर्षी, तो कसोटीत 1000 धावा करणारा जो रूटनंतरचा पहिला भारतीय आणि एकूणच जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. तसेच याशिवाय 22 वर्षीय यशस्वीने भारतासाठी मोठा विक्रम केला. एका कॅलेंडर वर्षात 1000 कसोटी धावा करणारा तो भारताचा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.
एकंदरीत, एका कॅलेंडर वर्षात 1000 कसोटी धावा करणारा तो जगातील दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. यशस्वीपेक्षा कमी वयात फक्त एबी डिव्हिलियर्सने ही कामगिरी केली आहे. डिव्हिलियर्सने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात कसोटीत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी…
या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वीच्या बॅटने चांगली कामगिरी केली होती. त्या मालिकेत यशस्वीने नऊ डावांत 712 धावा केल्या होत्या ज्यात दोन द्विशतकांचा समावेश होता. या मालिकेत यशस्वीची सरासरी 89 आणि स्ट्राइक-रेट 80 होता. त्याच्या फलंदाजीने बेझबॉलची हवा काढून घेतली. मात्र, त्यानंतर त्याला तशी कामगिरी करता आलेली आहे. यशस्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सपशेल अपयशी ठरला. तेथे त्याला चार डावात केवळ 50 धावा करता आल्या. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यशस्वीने चार डावांत 189 धावा केल्या ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. या मालिकेद्वारे यशस्वीच्या पुनरागमनाची झलक दिसली, पण न्यूझीलंडविरुद्ध तो पुन्हा संघर्ष करताना दिसत आहे. न्यूझीलंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीत त्याने दोन्ही डावात मिळून (13 आणि 35) 48 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात तो 30 धावांवर माघारी परतला.





