IND vs NZ 2nd Test : फुलटॉसवर कोहली बाद होणे धक्कादायक – मिचेल सँटनर

IND vs NZ 2nd Test :- भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरु आलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने भारताचे ७ बळी टिपले. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्याने फुलटॉसवर भारताची रनमशीन असलेल्या विराट कोहलीला बाद केले. कोहली ज्याप्रकारे बाद झाला, हे धक्कादायक असल्याची कबुली न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने दिली. सँटनरच्या गोलंदाजीने भारताचा पहिला डाव १५६ धावांमध्ये संपुष्टात आला.
लढतीनंतर बोलताना सँटनर म्हणाला, विराट कोहली सहसा असे चेंडू सोडत नाही. मात्र त्याच्याकडून तो चेंडू सुटला व सरळ यष्टीवर आदळला, हे माझ्यासाठी देखील धक्कादायक होते. सँटनरने दुसऱ्या दिवशी शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाशदीप व जसप्रीत बुमराह अशा ७ फलंदाजांना तंबूत पाठविले. नेहमीच्या वेगापेक्षा मी कमी वेगाने चेंडू फेकत होतो. परंतु अशा प्रकारच्या गोलंदाजीवर साधारण फलंदाज थेट षटकार ठोकतो, मात्र आज जे झाले ते नक्कीच छान होते, वेगामध्ये बदल करणे आज फायदेशीर ठरल्याचे सँटनर म्हणाला.
भारत अधिक आक्रमक होईल
दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंडकडे ३०१ धावांची आघाडी असून अजून कसोटीचे तीन दिवस शिल्लक आहेत. सध्याच्या घडीला न्यूझीलंडची स्थिती मजबूत असून कसोटी व मालिकेवर पकड मिळविण्यात यश मिळाले आहे. भारत आता अजून आक्रमक होईल व आम्हाला बॅकफूटवर ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारताचा अजून एक डाव शिल्लक आहे. त्यामुळे आता आम्हाला जेवढ्या जास्त धावा करता येतील, तेवढे चांगले आहे. यामुळे गोलंदाजी करताना दडपण येणार नसल्याचे सँटनरने बोलताना सांगितले.





