Pune (IND vs NZ 2nd Test) : – बेंगलुरुच्या लढतीमध्ये पहिल्या डावात भारताची घसरगुंडी उडाल्यानंतर दुसऱ्या डाव सर्फराजच्या खेळीने सावरला होता. या लढतीत सर्फराजने पहिले कसोटी शतक साजरे केले. मात्र, त्यावेळी अंतिम संघात असणाऱ्या केएल राहुल कडून अपेक्षा असून देखील त्याला चांगली खेळी करता आली नाही. पहिल्या कसोटीत मानेच्या दुखण्याने बाहेर असणार शुभमन गिल देखील तंदुरुस्त झाल्याने, दुसऱ्या कसोटीमध्ये राहुलला बाहेर बसावे लागण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय संघात स्थानावरून मोठी स्पर्धा सुरु आहे. ऋषभ पंतने बांगलादेश कसोटीतून दमदार पुनरागमन केले होते. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये 99 धावांची तडाखेबंद खेळी केली. या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. पहिल्या डावात यष्टिरक्षण करत असताना एक चेंडू थेट त्याच्या उजव्या पायावर धडकला होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात त्याच पायावर शस्त्रक्रिया झाली होती. यावेळी संघाबरोबर असणाऱ्या ध्रुव ज्यूरेलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर पंतने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना धडाकेबाज खेळी केली. आता दुसऱ्या कसोटीसाठी देखील तो सज्ज झाला आहे. पहिल्या कसोटीमध्ये मानेच्या दुखण्याने शुभमन गिल खेळू शकला नव्हता. मात्र, त्याने बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत शानदार शतकी खेळी केली होती. सध्याचा शुभमन गिलचा फॉर्म पाहता, त्याला अंतिम 11 मध्ये खेळविण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी देखील शुभमन गिलने भारताला चांगाली सुरुवात करून दिलेली आहे. याचबरोबरीने सर्फराजने पदार्पणाच्या कसोटीमध्ये दीडशतकी खेळी करताना आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याने दुसऱ्या डावात विराट कोहली व ऋषभ पंत यांच्या सोबत दमदार भागीदारी करताना संघाला दुसऱ्या डावात आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. केएल राहुलचे अपयश बांगलादेश विरुद्ध कर्नाटकच्या केएल राहुलला विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्याने पहिल्या कसोटीमध्ये 16 व 22 तर दुसऱ्या कसोटीमध्ये 68 धावांची खेळी केली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये राहुलने पहिल्या डावात 0 तर दुसऱ्या डावात 12 धावाच करता आल्या. चांगली संधी मिळून देखील त्याला संधीचा फायदा घेता आला नाही. मागील 3 कसोटीमध्ये त्याने 118 धावा केल्या आहेत. पुणे येथील सरावापूर्वी बोलताना संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी राहुलचे समर्थन केले. आम्ही राहुलला अजूनही संधी देण्यास इच्छूक असलो तरी पुण्याच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊनच संघ निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, ‘हा’ स्टार फलंदाज दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर.. पुण्यातली भारताची कामगिरी… भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या दुसरा सामना (24 ते 28 आॅक्टोबर) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानावर होणार आहे. या मैदानावर आतापर्यंत केवळ 2 कसोटी सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन पैकी एका लढतीत भारताला विजय मिळाला आहे तर दुसरा सामना गमवावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीमध्ये भारताने एक डाव व 137 धावांनी विजय साकारला होता. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धची लढत भारताला 333 धावांनी गमवावी लागली होती. दोन्ही संघाची सध्याची कामगिरी पाहता, पुण्यातील लढत चुरशीची होणार यात शंकाच नाही. बंगळुरूमध्ये देखील दोन्ही संघांनी चांगली टक्कर दिली होती.