IND vs NZ 2nd Test : मोहम्मद सिराजला पुणे कसोटीतून मिळू शकतो डच्चू; जाणून घ्या, नेमकं कारण…

IND vs NZ 2nd Test : न्यूझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाला 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना पुण्यात होणार आहे.
पुणे कसोटीत विजय मिळवून टीम इंडियाला मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पुणे कसोटी सामन्यातून वगळले जाऊ शकते, असे वृत्त समोर येत आहे.
सिराजला का वगळलं जाऊ शकते?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या एका बॉलिंग कोचचे म्हणणे आहे की, सिराजने चेंडूला जास्त उसळी मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर अधिक विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर सिराज अधिक प्रभावी ठरला आहे. त्याच्या कसोटी रेकॉर्डवर नजर टाकल्यास सिराजने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर 80 पैकी 61 विकेट घेतल्या आहेत. तर भारतात त्याने फक्त 19 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी प्रत्येक परिस्थितीत प्रभावी ठरतात, सिराजमध्ये ही क्षमता नाही. त्यामुळे सिराज भारतात अपयशी ठरत आहे.
वॉशिंग्टन सुंदरला मिळू शकते संधी…
फिरकी गोलंदाज अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचाही टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. पुण्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टी असणार आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून वगळून वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला जाऊ शकतो. वॉशिंग्टन सुंदरनेही अलीकडे रणजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यात सुंदर हा कर्णधार रोहित शर्माची पहिली पसंती ठरू शकतो.





