IND vs NZ 2023 । टीम इंडियाला निर्विवाद वर्चस्वाची संधी; उद्या तिसरा एकदिवसीय सामना

इंदूर – पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामने जिंकल्यावर आज (मंगळवार) होत असलेल्या तिसऱ्या सामन्यासह तीन सामन्यांच्या या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे. या मालिकेत भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यापूर्वी मायदेशात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही संघाने विजय मिळवला होता. आता या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले असून आजचा तिसरा व अखेरचा सामना जिंकत निर्विवाद विजय मिळवणे हेच भारतीय संघासमोरचे लक्ष्य आहे.
यंदाच्या वर्षी भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत असल्याने भारतीय संघही सातत्याने एकदिवसीय सामने खेळत आहे. भारतीय संघाची फलंदाजी न्यूझीलंडपेक्षा जास्त भक्कम असल्याचे या मालिकेत दिसून आले. या सामन्यातही अनुभवी खेळाडूंसह नवोदितांवर लक्ष राहणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत असून त्यांची फलंदाजीची सर्व मदार विराट कोहलीसह इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांच्यावरच राहणार आहे.
IND vs NZ 2023 | भारतीय खेळाडू बाबा महाकालच्या दर्शनाला; ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना
गोलंदाजीतही अनुभवी महंमद शमीसह महंमद सिराज, उमरान मलिक यांच्यासह शार्दुल ठाकूरवरही न्यूझीलंडला रोखण्याची जबाबदारी राहील. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ भक्कम वाटत असला तरीही त्यांच्या खेळाडूंची भारतीय भूमीवरील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, हेनरी निकोलस, डॅरेल मिशेल हे भरात असलेले फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर त्यांच्या फलंदाजांना फिरकीसह भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोरही यश आलेले नाही.
भरतला खेळवणार का
भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकल्यामुळे ही मालिका तर जिंकलीच आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. संघात अतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज के. एस. भरत असून त्याला आजच्या सामन्यात खेळवणार का हा प्रश्न आहे. नियमित यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अपघातात दखमी झाल्यामुळे पुढील काही काळ संघाला इशान किशनच्या जोडीने भरतचीही गरज राहणार आहे. त्यामुळे त्याला मॅच प्रॅक्टिस देणेही आवश्यक आहे.





