IND vs NZ 1st Test : बेंगळुरू कसोटीत यशस्वी जैस्वालला इतिहास रचण्याची संधी, फक्त ’71’ धावांची गरज….

IND vs NZ 1st Test (Yashasvi Jaiswal) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारी (16 ऑक्टोबर) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालवर असतील. या सामन्यात यशस्वी जैस्वालला इतिहास रचण्याची संधी आहे. यशस्वी जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती.
‘अशी’ कामगिरी करणारा ठरू शकतो पहिला भारतीय…
यशस्वी जैस्वालने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 929 धावा केल्या आहेत. अशातच जर त्याने पहिल्या सामन्यात 71 धावा केल्या तर 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय ठरेल. यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 8 सामन्यांच्या 15 डावात 50.92 च्या सरासरीने 662 धावा केल्या आहेत.
2024 मध्ये केवळ एकाच फलंदाजाने गाठला आहे 1 हजाराचा टप्पा…
साल 2024 मध्ये फक्त एकाच फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जो रूट असे या फलंदाजाचे नाव आहे. जो रूट यंदा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने 12 सामन्यांच्या 21 डावात 65.68 च्या सरासरीने 1 हजार 248 धावा केल्या आहेत. या वर्षी त्याने 5 शतके आणि 4 अर्धशतकेही केली आहेत. या यादीत श्रीलंकेचा युवा फलंदाज कमिंडू मेंडिस दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 943 धावा केल्या आहेत.
साल 2024 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
जो रूट (इंग्लंड) : 1 हजार 248 धावा
कामिंदू मेंडिस (श्रीलंका) : 943 धावा
यशस्वी जैस्वाल (भारत) : 929 धावा
बेन डकेट (इंग्लंड) : 791 धावा
ओली पोप (इंग्लंड) : 745 धावा





