IND vs ENG : 10 विकेट घेणाऱ्या ‘या’ घातक खेळाडूची टीम इंडियात एन्ट्री

मॅनचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यात 23 जुलै 2025 पासून मॅनचेस्टर येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अर्शदीप सिंग दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडले आहेत. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने हरियाणाचा युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला इंग्लंडला पाचारण केले आहे. आकाश दीपने ग्रोईनच्या दुखापतीसह दुसरी आणि तिसरी कसोटी खेळली होती, तर अर्शदीपला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
कोण आहे अंशुल कंबोज?
हरियाणाच्या करनालमधील इंद्री येथील फाजिलपूर गावात राहणारा अंशुल कंबोज हा शेतकरी कुटुंबातील आहे. 6 डिसेंबर 2000 रोजी जन्मलेल्या अंशुलचे वडील उधम सिंग शेती करतात. अंशुलला वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अडथळे येऊ नयेत म्हणून पालकांनी त्याला करनालच्या ओपीएस विद्यामंदिर शाळेत दाखल केले.
अंशुल कंबोजची निवड का?
अंशुलने मागील रणजी हंगामात 34 बळी घेत आपली छाप पाडली होती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन सामन्यांत त्याने 4 डावांत 5 बळी घेतले. अंशुल केवळ वेगवान गोलंदाजीच नव्हे, तर चांगली फलंदाजीसुद्धा करतो. अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 स्तरावर उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याची हरियाणा संघात निवड झाली. विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली, तर 2024-25 च्या दुलीप ट्रॉफीमध्ये तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.
आयपीएलमधील कारकीर्द
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने अंशुलला 20 लाखांना खरेदी केले. त्याने 3 सामन्यांत 2 बळी घेतले. 2025 च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर 3 कोटी 40 लाखांची बोली लावून संघात सामील करून घेतले.
रणजीतील ऐतिहासिक कामगिरी
केरळविरुद्धच्या सामन्यात अंशुलने 30.1 षटकांत 9 मेडनसह 49 धावांत 10 बळी घेत इतिहास रचला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका डावात 10 बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी बंगालच्या प्रेमांगशू चटर्जी आणि राजस्थानच्या प्रदीप सुंदरम यांनी ही कामगिरी केली होती. भारतीय संघ आता अंशुलच्या समावेशाने चौथ्या कसोटीसाठी सज्ज होत आहे. त्याची अष्टपैलू कामगिरी आणि फॉर्म पाहता, तो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.





