IND vs BAN 1st Test 2024 : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, सरफराजला संधी तर श्रेयसला डच्चू…

Team India for the first test against Bangladesh : बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली गोलंदाजी करणाऱ्या आकाशदीप आणि यश दयाल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर तीन यष्टीरक्षक फलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेशविरुद्ध आयडीएफसी फर्स्ट बँक कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला. निवडकर्त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या संघातील बहुतांश खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्याचबरोबर ऋषभ पंत आणि केएल राहुल संघात परतले आहेत.
दुलीप ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतच्या यष्टिरक्षण आणि फलंदाजीमुळे प्रभावित होऊन निवडकर्त्यांनी त्याचा कसोटी संघात समावेश केला आहे. कार अपघातात जखमी झाल्याने ऋषभ पंत बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. पंतने आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन केले. टी-20 आणि एकदिवसीय संघात स्थान निर्माण केले आणि आता तो कसोटी सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
आकाशदीप आणि यशला संधी…
दुलीप ट्रॉफीमध्ये 9 विकेट घेणाऱ्या आकाशदीपला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर आयपीएलमधून प्रसिद्धीझोतात आलेल्या यश दयाललाही संघात स्थान देण्यात आले आहे. अनुभवी आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यावर फिरकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी 16 सदस्यीय संघात चार फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. दोन यष्टिरक्षकांसह एकूण आठ फलंदाज आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल प्रथमच भारतीय संघात सामील झाला आहे. तो आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळला होता.
🚨 NEWS 🚨- Team India’s squad for the 1st Test of the IDFC FIRST Bank Test series against Bangladesh announced.
Rohit Sharma (C), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Virat Kohli, KL Rahul, Sarfaraz Khan, Rishabh Pant (WK), Dhruv Jurel (WK), R Ashwin, R Jadeja, Axar Patel, Kuldeep… pic.twitter.com/pQn7Ll7k3X
— BCCI (@BCCI) September 8, 2024
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ :- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
दरम्यान, भारतीय संघाला 27 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळायची आहे. मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी संघाची निवड अद्याप झालेली नाही. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेशिवाय भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघाची निवड झालेली नाही.





